{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
20
Sunday, February 07, 2010

महागाई

महाराष्ट्रात महागाई उतू चाललीय आणि लोकप्रतिनिधी मात्र याकडे कानाडोळा करून बाकी वाद करण्यातच गुंतले आहेत, आणि निवडणुकीच्या वेळेस दिलेली आश्वासने विसरून गेलीत. त्यांना महागाईची झळ पोचत नाहीये कारण अधिकृतरित्या त्यांना सरकारकडून सवलती मिळतात, शिवाय वरकमाई आहेच.

पहा त्यांना मिळणारे भत्ते - मासिक वेतन १२००० रूपये,  वेगवेगळ्या कामकाजासाठी १०००० रूपये,  कार्यालयीन खर्चासाठी १४००० रूपये,  प्रवासभत्ता ४८००० रूपये,  अधिवेशन काळातील हजेरी भत्ता रोज ५०० रूपये,  देशभरात रेल्वेतून देशभर कुठेही पहिल्या वर्गातून प्रवास,  विमानप्रवास बिझनेस क्लासमधून पत्नी अथवा पी.ए. सोबत ४० वेळा मोफत प्रवास,  घरगुती वापरासाठी ५०००० युनिट पर्यंत मोफत वीज म्हणजेच साधारण ४००००० रूपये जमा,  दूरध्वनीचे १ लाख ७० हजार मोफत कॉल्स,  म्हणजेच प्रत्येक खासदारावर वर्षाला अंदाजे ३२ लाख रूपये खर्च सरकारी तिजोरीतून, आणि असे ५३४ खासदार आहेत म्हणजे आपल्या कराच्या पैशातून हे लोकप्रतिनिधी ८५५ कोटी रूपये खातात. कोण काय करू शकते, कारण आपणच त्यांना निवडून दिले आहे ना?  आता  आम्हाला सांगा  कशी यांना समजणार महागाई म्हणजे काय ते? एवढे असूनही हे आपापसातच भांडत बसलेत. अगदी मराठी अमराठी वाद, शाहरूख खान काय म्हणाला, कोणी म्हणतो मी ज्योतिषी नाही, कोणी चित्रपटाचे राजकारण करतोय, कोणी लोकलमधून प्रवास करून स्टंटबाजी करतो पण यांना विद्यार्थ्यांच्या आत्महत्त्या दिसत नाहीत, साखरेचे भाव समजत नाहीत.

दुर्दैव आपले आपल्याला अशा देशात रहावे लागते ते.


दिलीप खापरे@6:01 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


20
Friday, February 05, 2010

अल्झायमर आणि बल्लभगड

जगात अनेक देशांमध्ये एक विकार समस्या बनून राहिला आहे, तो म्हणजे अल्झेमर्स डीसीज किंवा विस्मरणाचा विकार. यावर बरेच संशोधन झाले, पण सा विकार एक समस्या बनूनच राहिला आहे. इंग्लंड मध्ये तर सुमारे नऊ लाख लोक या विकाराने ग्रासले आहेत आणि हा विकार सर्व जगभर पसरण्याची भिती शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. भारतात भिती बाळगण्याचे कारण नाही कारण या देशात अनेक रोगांनी पाय रोवला आहे.

पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा भारतात, उत्तरेला बल्लभगड नावाचे एक खेडेगाव आहे, तिथे मात्र विस्मरणाचा विकार वृद्ध मंडळीत अजिबात आढळत नाही. बहुतेक म्हातारी माणसे सकाळ्ची कामे उरकली की एका ठराविक ठिकाणी जमतात आणि प्रसन्न गप्पा मारतात. इंग्लंडमधील पीतसबर्ग विद्यापीठातील  शास्त्रज्ञ या गावी ठाण मांडून या लोकांचा अभ्यास करीत आहेत. यांनी पाच हजारांहून अधिक लोकांची अल्झेमर्सची चाचणी घेतली आहे. आणि यावर निरनिराळ्या प्रक्रिया राबवत आहेत. हा मागासलेला भाग आहे, परंतु या लोकांची स्थानिक संस्कॄतीच यासाठी कारणीभूत असावी असे शात्रज्ञांचे मत आहे. या भागातील लोकांचे सरासरी आयुष्यमान तुलनेने प्रगत देशांपेक्षा खूप कमी आहे,पण यांना हा विकार नाही. जगात सर्वत्र हा रोग पसरलेला असताना सुद्धा या भागात लागण नाही, याचेच आश्चर्य डॉ. विजय चंद्रा यांना वाटते. त्यांच्या मते अल्झेमर्स विकारासाठी ’एपीओ ४ इ’ हे जनुक कारणीभूत असते, पण बल्लभगडच्या लोकांत हे जनुक आढळतच नाही, याचेच शात्रज्ञांना नवल वाटते.

बल्लभगडचे लोक शाकाहारी आहेत , ते खूप कष्ट करतात, शेतीवाडी चांगली पिकत असल्याने मानसिक ताण तणाव नाही, एकत्र आणि सुदृढ कुटुंब पद्धती ही प्रमुख कारणे, अल्झायमर विकार न होण्यासाठी असावीत. ह्या विचाराने असाच कार्यक्रम जगभर राबवावा असे जागतिक पातळीवर ठरत आहे.

बल्लभगडच्या लोकांकडून एक चांगला धडा शिकण्यासारखा आहे.


दिलीप खापरे@2:25 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


20
Wednesday, February 03, 2010

उर्मिला धनगर

झी मराठी वरील सारेगमप कर्यक्रमाची अंतीम फेरी ३१ जानेवारीला झाली त्यात उर्मिला धनगर, अभिलाषा चेल्लम आणि राहुल सक्सेना यांनी अप्रतीम गाणी सादर केली. या गायकांना आणि अशा हजारो गायकांना झी मराठी जे प्रोत्साहन देते आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. शिवाय आम्हा रसिकांनाही काही तरी वेगळे ऐकायला मिळते, हा सुवर्णयोग आहे.

सारेगमपच्या कार्यक्रमामुळे महाराष्ट्रातील आणि देश, जगभरातील प्रेक्षकांना संगीतातील खाचाखोचा, त्यातील लय समजली आणि संगीताचा निखळ आनंद लुटता आला. राहुल सक्सेना आणि अभिलाषा चेल्लम हे दोघेही अमराठी असताना सुद्धा, त्यांच्याकडून अवधूत गुप्ते आणि सलिल कुलकर्णी याणी जी मेहनत करून घेतली, त्यास तोडच नाही. हे दोघेही गाताना अजिबात अमराठी वाटत नव्हते. शिवाय त्यांनी जी क्षमता सिद्ध केली ती कौतुकास्पदच आहे.

उर्मिला धनगर ही महागायिका बनली, तिला मायबाप प्रेक्षकांनी जी दाद दिली, ती तिच्यातील गायिकेला. तिची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेता, तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या लावण्या पेश करणे म्हणजे शिवधनुष्य पेलण्या सारखे आहे असे म्हणत पण उर्मिला धनगरने ते लीलया पेलले. एका कार्यक्रमात लावणी सादर केली तेव्हा सुलोचनाबाईंनी तिला भरभरून दाद दिली, हीच तिच्या यशाची पावती ठरली. लावणीतील तो नखरा, अदा, मादक सौंदर्य, अर्थवाहीपण फक्त उर्मिला धनगरनेच पेश करावे, तिच्यासारखी तीच.

अजय अतुल सारखे महान संगीतकार सुद्धा म्हणाले, उर्मिलाला कोणाचीही दृष्ट लागू नये. बस आणखी काय पाहिजे!

मराठी रसिकांनी उर्मिला धनगरची जी निवड केली, त्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.


दिलीप खापरे@1:49 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


20
Thursday, January 28, 2010

पालकांसाठी.....

काही वर्षांपूर्वी शाळेतील मुलांना ’परिक्षा’ या विषयावर चित्र काढायला सांगितले तेव्हा मुलांनी राक्षसाचे चित्र काढले. यावरून मुलांच्या मनात परिक्षेविषयी किती भिती आहे याचा अंदाज येतो. त्यांच्या मनात नकारात्मक भावना आहे हेच जाणवते. यावरून असा बोध होतो की, त्यांच्याकडे कानाडोळा करून चालणार नाही. जशा आपण मुलांकडून अपेक्षा करतो, त्याच प्रमाणे मुलांनाही पालकांकडून काही अपेक्षा असतातच ना? मुले नेहमी पालकांकडे आशेने बघत असतात. लहान मुलांना बागुलबुवाची भिती दाखवली, किंवा मुले घाबरली तर त्यांना आईच्या पदराशिवाय दुसरी सुरक्षित जागाच सापडत नाही.

पालकांनो जरा कामाधंद्यातून वेळ काढून मुलांच्या समस्या समजावून घ्याव्यात. चांगल्या शाळेत, मोठे डोनेशन देऊन घातले, आणि मोठा क्लास लावला म्हणजे आपले कर्तव्य संपले असे समजू नका. मुलांना शाळेत काही ताणतणाव आहे का? याची चौकशी करा. कधीकधी काय होते वर्गातील एखादा बंड मुलगा त्रास देत असतो, आणि आपला मुलगा त्याला घाबरून शाळेत जात नाही म्हणतो, मग त्याला धाक दाखवून शाळेत पाठविल्यास त्याची घुसमट होते आणि तो मग सगळे मार्ग संपल्यावर अतिरेकी होतो. त्याला जवळ बसवून त्याची विचारपूस करा.

आपल्याला सर्वांना मुलांची काळजी असते, आणि काळजी असावी, पण नुसतीच असू नये त्यासाठी सजग असावे. मुलांवर कोणतेतरी दडपण नाही ना, याची खात्री करावी. आपल्याला पाल्याची काळजी वाटते, हे मुलांना पटविण्यासाठी त्यांच्याबरोबर आपुलकीने मैत्रीपूर्ण संवाद साधावा, त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने बोलावे. त्याच्या समस्या जाणून घ्याव्यात. त्याला अभ्यासाचे ओझे वाटत नाही ना ते पाहावे. शनिवार रविवारी मुलांना बागेत न्यावे, त्यांना काय हवे नको ते पहावे, म्हणजे मुलांना वाटते एक दिवस का होईना आईबाबा आपल्याल वेळ देतात, त्यामुळे मुलांची मने फ्रेश होतात. मुलांना आवडणारे पदार्थ शक्यतो घरीच उपलब्ध करून द्या. त्यांच्या आहारावर जातीने लक्ष द्या, नोकरांवर सोडू नका. रोज झोपण्यापूर्वी त्याची आपुलकीने चौकशी करा. त्यालाही बरे वाटेल.

शेवटी आपण सर्व कुणासाठे करतो, मुलांसाठीच ना? लक्षात घ्या मुलेच आपली भविष्यकाळ आहेत.     


दिलीप खापरे@10:15 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


20
Wednesday, January 27, 2010

सकारात्मक विचार

आपलं भूतकाळात चांगलं होतं की, आपण भविष्यकाळात चांगल्याची अपेक्षा करत आहोत, तर हे सर्व विसरा आणि विचार करा, आतचा जो आयुष्यातील बिंदू आहे तोच आपल्या जीवनात बदल घडवून आणणार आहे. आताचा हा बिंदू आहे तोच आपण होकारात्मक विचार करून एक चांगल्या सकारात्मक आयुष्याची सुरूवात करू यात. समजा जर आपला मेंदू काही नकारात्मक विचार करत असेल तर त्याला थांबवा आणि सकारात्मक विचाराकडे वळवा. एकदा का गाडीने रूळ बदलला ना तर काहीही करून आपण त्या गाडीची दिशा बदलू शकत नाही. तसेच विचारांचे आहे. यालाच म्हणतात विचारांतून बाहेर येणे.

कल्पना करा तुम्ही हॉटेलात बसलात, तेव्हा तुमच्या समोर मेनू येतो, हाच मेनू जर विचारांचा असेल तर? तुम्ही एक किंवा अनेक विचार निवडू शकता, आणि हेच विचार आपल्या भविष्यातील अनुभव ठरतील. बघा आपण एखादे अन्न खातो त्यापासून आजारपणा येते, आपण पुन्हा माहीत नसतांना तेच अन्न खातो पण मग लक्षात आल्यावर खातो का? नाही ना! तसेच विचारांचे आहे, द्या सोडून नकारात्मक विचार. जर समस्या निर्माण झाली तर ती कशी सोडवायची यापेक्षा ती का निर्माण झाली याचा विचार करा मग ती सोडविण्याचा. आपल्या मेंदूतील विचार आपले भविष्य घडवत असतात. 

शाळा कॉलेजातून शिकविले गेले पाहिजे की विचार कसे काम करतात, त्या विचारांना वळण कसे द्यावे. काय शिकून फायदा आहे? की कोण कधी जन्मला आणि मेला. सनावळ्या पाठ करायच्या कशासाठी, तर काय त्यांचे वाढदिवस साजरे करायचेत. कशासाठी पाहिजे, पानिपत युद्ध कधी झाले?. त्यापेक्षा मुलांना शिकवा जगात धन चांगल्या मार्गाने कसे मिळवायचे, भ्रष्टाचार म्हणजे काय, मिळवलेले पैसे कसे व्यवस्थित जपून ठेवायचे, चांगले आईवडिल म्हणजे काय. लोकांशी चांगले संबंध कसे निर्माण करावेत,सकारात्म विचार कसा करावा, बाबा आता अशा ज्ञानाची गरज आहे. कल्पना करा असा अभ्यासक्रम असेल तर भावी पिढी कशी निर्माण होईल.

आकाशात पाहून हात वर करून,एक मंत्र रोज म्हणा ( कितीही वेळा ) -

या विश्वातील सर्व शुभ आणि पवित्र शक्तींचा स्वीकार करण्यास माझा आत्मा तयार आहे आणि या शुभ आणि पवित्र शक्ती माझ्या समस्या दूर करून मला सुख प्राप्त करून देतील याची मला खात्री आहे.

आणि बघा काय बदल घडून येतो ते.


दिलीप खापरे@5:02 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .