{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Wednesday, May 06, 2009

नकारात्मक मत

भारतातील लोकशाही जगात सर्वात मोठी समजली जाते, त्याच लोकशाहीचे या लोकसभा निवडणुकीत जेम्तेम ५० टक्के मतदान करून मतदारांनी धिंडवडे काढले आहेत. कोणाही पुढार्‍याला काही समजत नाहीकी भाषणाला जमणारी गर्दी कुठे गेली. म्हणजे लोक फक्त गंमत पाहण्यासाठीच गर्दी करत होते तर. मतदारांनी भल्याभल्यांची गणिते चुकवली. हे असेच जर घडत राहिले तर एक वेळ अशी येईल की, मोजकेच शेकड्यात मतदान होईल. कोण पुढारी लायक आहे म्हणून उत्साहाने मतदान करावे. मतदान करून त्या उमेदवाराने पुढे अपेक्षाभंग करण्यापेक्षा नको ते मतदान. लोक मतदानाला जातील पण त्यांना नकारात्मक मतदान करण्याची सोय पाहिजे.

त्यासाठी मी एक पद्धत सुचवतो पहा -  मतदानाच्या बॅलेट मशिनवर प्रत्येक उमेदवाराच्या पुढे दोन बटने पाहिजेत. एक लाल आणि एक निळे किंवा हिरवे.प्रत्येकाला एका उमेदवारापुढे एकदाच बटण दाबता येईल. म्हणजे जर त्या मतदाराला कॉंग्रेसला मत द्यायचे आहे तर त्याने त्यापुधील निळे बटण दाबावे, आणि जर त्याला असे वाटत असेल की राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीच निवडून आला पाहिजे तर त्याला त्या उमेदवारापुढील लाल बटण दाबायची सोय पाहिजे ती पण एकदाच. म्हणजे जेव्हा निकाल जाहीर होतील तेव्हा प्रत्येकाला होय आणि नाही अशी दोन प्रकारची मते पडतील.म्हणजे हे समजेल की निवडून आलेला उमेदवार किती लोकांना नको होता. जर त्या निवडून आलेल्या उमेदवाराला होय पेक्षा नाहीची मते जास्त मिळाली तर त्याची निवड रद्द करावी आणि पुन्हा निवडणूक घ्यावी. पण या उमेदवारांना पुन्हा उभे राहू देऊ नये. जर कोणाही उमेदवाराला ५० ट्क्क्यांपेक्षा जास्त नकारात्मक पसंती मिळत असेल तर त्याला कायम स्वरूपी निवडणुकीला अपात्र ठरविण्यात यावे. म्हणून नकारात्मक मत फार महत्वाचे ठरवावे. एखादा उमेदवार निवडून जरी आला तरी त्याला  समजू दे किती मतदार  आपल्या  विरूद्ध आहेत ते.

आता विधानसभा निवाडणुका जवळ आल्यात.


दिलीप खापरे@4:12 AM < 4 (1) @ Add
Wednesday, May 06, 2009 7:30:00 PM
Anonymous आशा जोगळेकर म्हणतात की....

बरोबर आहे तुमचं


. . ° º o O o º ° . .


Tuesday, May 05, 2009

भगवान

एका संन्याशाला एकदा स्वप्न पडले. स्वप्नात तो स्वर्गात गेला. तेथे रस्त्यावर मोठी गर्दी झालेली त्याला दिसली. त्या गर्दीतील एकाला त्याने विचारले, एवढे लोक का जमले आहेत? त्या व्यक्तिने सांगितले, आज भगवानांचा जन्मदिन आहे. ते येथून जाणार आहेत. संन्याशाला आपल्या भाग्याचा हेवा वाटला. साक्षात भगवानाचे दर्शन घडणार. थोड्या वेळाने एका उमद्या घोड्यावरून एक राजबिंडा तरूण आला. त्याच्यामागे हजारो लोक होते. त्याला पाहून संन्याशाने विचारले, हेच का ते भगवान? ती व्यक्ति म्हणाली, नाही हे भगवान नाहीत. हे राम आहेत. त्यांना माननारे लोक त्यांच्या मागून जात आहेत.... याच पद्धतीने येशू, बुद्ध, महावीर, गुरू नानक, ज्ञानेश्वर वगैरे असे सर्वजण येऊन गेले.

भगवानांची वाट पाहता पाहता मध्यरात्र झाली. दुसरा दिवस उजाडला. सारे लोक कंटाळून गेले निघून गेले. आणि त्या निर्मनुष्य रस्त्यावरून एक म्हातारा एकटाच आला. त्याच्या चेहर्‍यावर एक प्रकारचे तेज होते. संन्याशाने त्याला विचारले, आपणच भगवान का? म्हातारा म्हणाला, हो. संन्याशाने विचारले, मग आपल्यामागून कोणीच कसे येत नाही? तो म्हातारा म्हणाला, सारे राम, बुद्ध, येशु, महावीर वगैरेंबरोबर गेले. जो कोणाबरोबर जात नाही तोच माझ्याबरोबर येऊ शकतो. आतापयंत तू माझी वाट पहात उभा आहेस तर मग चल माझ्या बरोबर. भगवानांनी सांगितले, ते  बघ तिकडे दूरवर मी जातो तू माझ्या मागून ये. असे म्हणून भगवान अंतर्धान पावले.

संन्याशाने पाहिले तर समोर एकदम गरम असे वाळवंट त्याला दिसले, तो विचार करू लागला आता आपण कसे जायाचे. मग त्याने  धीर  करून पाऊल पुढे टाकले, तर ती वाळू त्याला भासलीच नाही. तो भराभर पुढे चालू लागला, शेवटी वाळवंटपार पोहोचल्यावर त्याला भगवान भेटले. त्याने भगवानाला विचारले, आपण मला एकट्याला का बरे सोडून आलात, मी एवढ्या गरम वाळवंटातून कसा आलो असतो? तेव्हा भगवान म्हणाले, वेड्या मी तुझ्यासोबतच होतो मागे वळून पहा दोनच पावले दिसताहेत, ती माझी आहेत मी तुला कडेवर उचलून घेतले होते, म्हणून तुझे पाय भाजले नाहीत.

कोणाच्या मागे धावावे, हा विचार आपण करावा, आणि देवाच्या कडेवर बसावे.


दिलीप खापरे@8:27 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


Thursday, April 30, 2009

मतदान का नाकारावे

भारतात लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला, आणि एक भयानक सत्य बाहेर आले. किती टक्के मतदान झाले? ५० टक्क्यांच्या वर कोठेच नाही. पुण्या सारख्या सांस्कृतिक शहरात ४६ टक्के मतदान व्हावे, आणि मुंबईसारख्या शहरात  ४० टक्के म्हणजे उमेदवारांची हार नाही काय?

मतदान न केलेले बहुतेक सर्वजण मध्यम वर्गीय आणि उच्च वर्गीय असणार. बरे लोकांनी काय म्हणून मतदान करावे. लोक भाषणाला हजेरी लवतात, पेपरमध्ये विराट जनसमुदायाचे चित्र छापून येते, पणा मतदान मात्र होत नाही, याचा उमेदवारांनी बोध घ्यावा. नुसती गर्दी जमली म्हणजे आपण बाजी मारली असे नाही.

लोक विचार करतात, आणि जाहीरनाम्यातली आश्वासने वाचून करमणूक करून घेतात. कारण लोक जाणतात, ही आश्वासने आमच्याच करातून आहेत. एवढी संपती जाहीर करतात, पण एका तरी लेकाच्याने, त्या संपत्तीतला वाटा देशाला, अनाथाश्रमाला दान केला आहे काय? कोणी म्हणले काय की, आम्ही झोपडपट्टी साठी एवढा निधी देतो. बस जेकाही आहे ते लोकांच्या पैशावर. एकमेकांबद्दल जाहीर सभेत चिखलफेक करायची, पण आपण मागील पाच वर्शात काय काम केले ते मात्र प्रत्येक उमेदवाराने सांगायचे टाळले, काय सांगणार काम केले असेल तर ना? उमेदवारंचे कार्यकर्ते कोणाच्याही  घरी आले  नाहीत. कोणाला स्लीपा वाटल्या नाहीत. लोक नाराज झाले.

हे जे काही मतदान झाले त्यात, पहिल्यांदाच कुतुहलाने मतदान करणारे १८ वर्षांचे मतदार असाणार? खालच्या वर्गातले मतदार असणार. सुशिक्षित मतदार नसणारच.

मतदान का करावे, हे लोकांना कळेचना. राष्ट्रीय कर्तव्यापेक्षा लोकांना त्यांच्या समस्या महत्वाच्या वाटतात, आणि त्यावर कोणीच काही बोलत नाही. बेरोजगारी, भारनियमन, अतिरेकी हल्ली, शिक्षणाचा खेळ खांडोबा, जागतिक मंदी, पाण्याचा प्रश्न, गुन्हेगारी या विषयावर जर कोणी आश्वासन देणार नसतील तर काय फरक पडतो कोणीही निवडून आले तर?

मतदान केल्यावर काय भरोसा तो उमेदवार पक्ष बदलणार नाही ते. कशावरून तो सगळी आश्वासने पाळेल. कारण नंतर त्याने आश्वासने पाळली नाहीत तर भारतात असा कोणताही कायदा नाही की त्या उमेदवाराला कोर्टात खेचता येईल. मग का मतदान करावं.


दिलीप खापरे@8:12 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


Wednesday, April 29, 2009

स्वाईन फ्लु (H1N1)

जगभर स्वईन फ्लु पसरत असताना भारताने खुप काळ्जी घ्यायला हवी आहे. सरकारने अतिदक्षता जाहीर केलेली असली तरी लोकांनी काळजी घेणे फार महत्वाचे आहे. WHO ने "पातळी ५" जाहीर केली आहे. "पातळी ५" म्हणजे आता ही साथ जगभरात पसरुन त्यामुळे मृत्यु होणारच. अमेरिका आणि युरोपातुन येणा‍र्‍या प्रवाशांना अतिशय कठीण होणार आहे. पण ह्या तापाचा आणि डुकराचा काही संबंध नाही हे फार जणांना माहीत नसेल.



View H1N1 Swine Flu in a larger map

Vishal KHAPRE | Mi Marathi Manus@5:50 PM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .


Tuesday, April 21, 2009

मी खासदार बोलतोय!

निवडणुका पार पडल्या आणि बाबा मी एकदाचा निवडून आलो, काय काय भानगडी कराव्या लागल्या त्या माझ्या मनालाच माहीत. तेव्हा आभार प्रदर्शन करायला बोलावले आहे तेव्हा चार शब्द सांगावे म्हणतो -

मला मायबापांनो तुम्ही निवडून दिलेत त्याबद्दल आभार, नाहीतरी मी निवडून येणारच होतो, कारण आपण तशी फिल्डींगच लावली होती ना. सर्व निवडणूक केंद्रांवर आपली माणसेच पेरली होती, काय खर्च आला म्हणून सांगू. आपण आधी कायपण खर्च केला नाही, पण बुथवर मात्र मोकळा हात सोडला होता.

या भागातील विकास कामे पूर्ण करण्यासाठी मी सर्व कंत्राटे जवळच्या माणसांना (नातेवाईकांना) देईन म्हणजे काम बरोबर न झाल्यावर बोलता येते हो, आणि शिवाय त्यांनी एवढी मेहनत घेतली आपल्याला निवडून आणायला, ती उगाच काय?

मी प्रत्येकाला रोजगार मिळवून देईन, पण शिक्षण पाहिजे बरं का, नाहीतर एम्प्लॉयमेंट एक्चेंज मध्ये नाव नोंदवायला मदत करेन.

नळाला पाणी येण्यासाठी प्रयत्न करेन, पण जर पाणी नाहीच आले तर टॅंकरची सोय करेन, आणि प्रत्येकाला खास निधीतून फिल्टर देईन. शेवटी आम्हालाही तुमच्या आरोग्याची काळजी आहेच ना!

मुलांना मोफत शिक्षणाची सोय करेन. त्यांना दुपारी खिचडीचा कार्यक्रम असेल, त्यासाठी माझ्या शेतातील तांदूळ वापरेन, त्यासाठी निधी वापरला जाईल. इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडल्या जातील, गावाचे मुलं कशी फाडफाड इंग्रजी बोलली पाहिजेत.

शेतकर्‍यांना भरभरून कर्जे दिली जातील, कर्ज माफी नाही, कारण ती कर्जे मिळतील ती पुढच्या निवडणुकीपर्यंत फेडायचीच नाहीत, म्हणजे पुढील वेळेस ती तुम्हाला पूर्ण माफ केली जातील, याची मी हमी देतो.

आपल्या भागात साधा विमानतळ नाही म्हणजे, हा अपमानच आहे. यासाठी मी कसून प्रयत्न करेन.जगाशी सांपर्क नको काय?

प्रत्येक घरात एक एक T.V.तो पण रंगीत देणार आणि नाहीतर आपले भाषण कसे लोक पाहणार.

उन्हाळ्यात प्रत्येकाला A.C.ची सोय करणार, हप्ताने बॅंकेकडून घेऊन देणार, नव्वद टक्के सबसिडीवर.

गावात कोणत्या देवाचे देऊळ नाही ते बघा, आपण बांधू म्हणजे उरसाची सोय झाली, तमाशा आयताच आला की नाही!

आपण जाहीरनाअमा छापलाच नाही, उगाच कोणीतरी पुढील निवडणुकी पर्यंत जपून ठेवला म्हणजे आली का पंचाईत.

हे जे आपण करणार आहे ते सर्व खासदार निधीतून, तेव्हा कोणाच्याही बापाचे काही जाणार नाही, तेव्हा कोणीही माज करायचा नाही. जे जसं मिळेल तसं गोड मानून घ्यायाचं काय!

ही सगळी तयारी मी पुढची निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन करीत आहे, एवढं ध्यानात ठिवा.   

( वरील सर्व कल्पनाविलास आहे, व्यक्तिगत कोणीही घेऊ नये )

Labels:


दिलीप खापरे@5:22 AM < 4 (0) @ Add

. . ° º o O o º ° . .