एकनाथी भागवत - श्लोक ६ व ७ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.

श्लोक ६ व ७ वा

अनूर्मिमत्त्वं देहेऽस्मिन्दूरश्रवणदर्शनम् ।

मनोजवः कामरूपं परकायप्रवेशनम् ॥६॥

स्वच्छन्दमृत्युर्देवानां सहक्रीडानुदर्शनम् ।

यथासङ्कल्पसंसिद्धीराज्ञाप्रतिहता गतिः ॥७॥

देहीं बाधिती ना ऊर्मि साही । ते अनूर्मिसिद्धी पहिली पाहीं ।

दूरली वाचा ऐके ठायीं । दूरश्रवण नवाई दुसरी सिद्धी ॥५०॥

त्रिलोकींचा सोहळा । बैसले ठायीं देखे डोळां ।

हे तिसरे सिद्धी लीला । दूरदर्शन कळा ती नांव ॥५१॥

मनोजवसिद्धी ऐशी आहे । कल्पिल्या ठायासी पाहें ।

मनोवेगें शरीर जाये । चौथी होये हे सिद्धी ॥५२॥

कामरूप सिद्धीची परी । जैशिया रूपाची कामना करी ।

तैसें रूप तत्काळ धरी । हे पांचवी खरी कामनासिद्धी ॥५३॥

आपुलें शरीर ठेवूनि दूरी । परशरीरीं प्रवेश करी ।

हे परकायप्रवेशपरी । सहावी साजिरी अतिसिद्धी ॥५४॥

काळासी वश्य नाहीं होणें । आपुलिये इच्छेनें मरणें ।

हे सातवी सिद्धी जाणणें । स्वच्छंदमरणें ती नांव ॥५५॥

स्वर्गीं देवांचें जें क्रीडन । त्यांचें हा देखे दर्शन ।

स्वयें क्रीडावया अंगवण । ते सिद्धी जाण आठवी ॥५६॥

जैसा संकल्प तैसी सिद्धी । ते नववी जाण पां त्रिशुद्धी ।

राजाही आज्ञा शिरीं वंदी । ज्याची गमनसिद्धी सर्वत्र ॥५७॥

ज्याची आज्ञा आणि गमन । कोठेंही अवरोधेना जाण ।

हें दहावे सिद्धीचें लक्षण । ज्ञानविचक्षण जाणती ॥५८॥

या गुणहेतुसिद्धींची विधी । म्यां सांगीतली हे त्रिशुद्धी ।

यांहीहोनि क्षुद्रसिद्धी । त्याही निजबुद्धीं अवधारीं ॥५९॥

Translation - भाषांतर
N/A
References : N/A
Last Updated : 2008-10-07T21:57:31.1994623-04:00


TOP

Comments | अभिप्राय

Copyright © khapre.org / TransLiteral Foundation / मी मराठी माणूस / मी मराठी.
By using this page, you agree to the Terms of Service. If you disagree, please close your browser immediately and remove all content that might have downloaded on your computer.
This work is licensed under a Creative Commons Attribution-NonCommercial-ShareAlike 2.5 License.
Best viewed at 1280x800 resolution or higher.