{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header

श्रीमध्वमुनीश्वराचें पद




देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.

Content
श्रीमध्वमुनीश्वराचें पद

शुकसनकादिक महिमा ज्याचा वर्णिती वेदपुराणींरे ।

गोकुळीं गोवळ होउनि गाई, चारी चक्रपाणीरे ।

जो हा पांडव घरिं हरि सारथि, पाजी तुरगा पाणीरे ।

तो हा सद्गुरु ज्ञानेश्वर हरि स्मरणें तारी प्राणी रे ॥१॥

ज्यानें केली भगवद्गीतेवरतीं सुंदर टीका रे ।

सादर परिसति होती त्यांची संसारांतुनि सुटकारे ।

प्राकृत भाषा रुचिकर रचिली करुनि सुधारस फिकारे ।

विरक्ति भक्ति ज्ञानाचाही पोषितो रस निकारे ॥२॥

दगडाची ही भिंति जयानें चालविली जड मातीरे ।

पैठणीं दिधली वेद परीक्षा वेडया रेडया हातींरे ।

सुवर्णाचा पिंपळ ज्याच्या द्वारी वैष्णव पहातीरे ।

अजान वृक्षाखालीं शांभव आसन घालुनि राहातीरे ॥३॥

मुक्तीपुरिहुनि श्रेष्‍ठ सनातन पाहतां क्षेत्र आळंदीरे ।

इंद्रायणीचें जळ जो सेवी, इंद्रपदासी निंदीरे ।

ज्याचे सन्निध सिद्धेश्वर तो सन्मुख शोभे नंदीरे ।

कार्तिक मासीं पंढरपुरपति, समाधि ज्याची वंदीरे ॥४॥

’ज्ञानेश्वर’ या नामाचा जो जप करि अनुदिनीं वाचेरे ।

त्याचे हृदयीं परमेश्वर तो, लक्ष्मी घेऊनि नाचेरे ॥

ज्याची टीका श्रवणीं पडतां, भवभय पर्वत कांचेरे ।

अगणित गुणागण मध्वमुनीश्वर वर्णीतो हे वाचेरे ॥५॥

Translation - भाषांतर

N/A
Details
References : N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2008-01-06T11:05:44.0453120Z
|-|-|
Comments | अभिप्राय