{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header

श्री नामदेव महाराज हरिपाठ




Shri Namadeva Haripatha - श्री नामदेव महाराज हरिपाठ
Content
श्री नामदेव महाराज हरिपाठ


नामाचा महिमा कोण करी सीमा ।
जपावें श्रीरामा एका भावें ॥१॥
न लगती स्तोत्रें नाना मंत्रें यंत्रें ।
वर्णिजे बा वक्‍त्रें श्रीरामनाम ॥२॥
अनंत पुण्यराशी घडे ज्या प्राण्यासी ।
तरीच मुखासी नाम येत ॥३॥
नामा म्हणें नाम महाजप परम ।
तो देह उत्तम मृत्युलोकीं ॥४॥

जन्माचें कारण रामनामपाठीं ।
जाइजे वैकुंठीं एकीहेळा ॥१॥
रामनाम ऐसा जिव्हे उमटे ठसा ।
तो उद्धरेल आपैसा इहलोकीं ॥२॥
दो अक्षरीं राम जप हा परम ।
नलगे तुज नेम नाना पंथ ॥३॥
नामा म्हणे पवित्र श्रीरामचरित्र ।
उद्धरिते गोत्र पूर्वजेंसी ॥४॥

विषयांचे कोड कां करिसी गोड ।
होईल तुज जोड इंद्रियबाधा ॥१॥
सर्वही लटिकें जाण तूं बा निकें ।
रामाविण एकें न सुटिजे ॥२॥
मायाजाळ मोहें इंद्रियांचा रोहो ।
परि न धरेचि भावो भजनपंथें ॥३॥
नामा म्हणे देवा करीं तूं लावलाही ।
मयूराचा टाहो घनगर्जना ॥४॥

कांसवीचे दृष्टी जैं येईजे भेटी ।
तैं अमृताची सृष्टी घडे त्यासी ॥१॥
तैसें हें भजन श्रीरामाचें ध्यान ।
वाचे नारायण अमृतमय ॥२॥
धन्य त्याचें कुळ सदा पैं सुफळ ।
दिननिशीं पळ रामनाम ॥३॥
नामा म्हणे चोखट भक्‍त तो उत्तम ।
वाचेसी सुगम रामनाम ॥४॥

सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ ।
वंदी कळिकाळ शास्त्र सांगे ॥१॥
ब्रह्मांडनायक ऐसें जें कौतुक ।
तेंचि नाम एक  श्रीकृष्ण ऐसें ॥२॥
आदि अंत पाहतां नाहीं पैं सर्वथा ।
परिपूर्ण सरिता अमृताची ॥३॥
नामा म्हणे अनंत कां करिशी संकेत ।
उद्धरिले पतित युगायुगीं ॥४॥

गोविंद गोपाळ वाचेसी निखळ ।
तो उद्धरे तात्काळ कलीमाजी ॥१॥
नारायण नारायण हेंचि पारायण ।
उद्धरले जन इहलोकीं ॥२॥
तुटती यातना कर्माच्या भावना ।
जडजीवउद्धारणा नाम स्मरा ॥३॥
नामा म्हणे राम हा जप परम ।
न लगती नेम नाना कोटी ॥४॥

तीर्थ जपराशी जप हृषीकेशी ।
मुखीं अहर्निशीं रामनाम ॥१॥
तीर्थाचें पैं तीर्थ नाम हें समर्थ ।
होईल कृतार्थ रामनामें ॥२॥
होईल साधन तुटेल बंधन ।
वाचे जनार्दन सुफळ सदा ॥३॥
नामा म्हणे हरी उच्चार तूं करीं ।
उद्धरसी निर्धारीं इहलोकीं ॥४॥

पाहतां ये परिपाटी आणिक नाहीं सृष्टी।
नामेंविण दृष्टीं न दिसे माझ्या ॥१॥
नमचि समर्थ नामचि मथित ।
शंकरासी हेत रामनामीं ॥२॥
भरती सर्व काम वाचे रामनाम ।
न लगती ते नेम कर्मजाळ ॥३॥
नामा म्हणे उच्चार न करीं तूं विचार ।
तुटेल येरझार नाना योनी ॥४॥

तपाचें हें तप राम हें अमूप ।
करीं का रे जप रामनामीं ॥१॥
रामकृष्ण म्हणे वाचे नारायण ।
तुटेल बंधन यमपाश ॥२॥
साधेल साधन होती कोटी यज्ञ ।
राम जनार्दन जपे करीं ॥३॥
नामा म्हणे जिव्हे नामस्मरण करी ।
म्हणे नरहरी एक्या भावें ॥४॥
१०
हाचि नेम सारीं साधेल तो हरी ।
नाम हें मुरारी अच्युताचें ॥१॥
राम गोविंद हरे कृष्ण गोविंद हरे ।
यादव मोहरे रामनाम ॥२॥
न लगती कथा नाना विकळता ।
नामचि स्मरतां राम वाचे ॥३॥
नाम म्हणे राम आम्हां हाचि नेम ।
नित्य तो सप्रेम जप आम्हां ॥४॥
११
करूं हें कीर्तन राम नारायण ।
जनीं जनार्दन हेंचि देखें ॥१॥
जगाचा जनक रामकृष्ण एक ।
न करितां विवेक स्मरें राम ॥२॥
तुटेल भवजाळ कां करिशी पाल्हाळ ।
सर्व मायाजाळ इंद्रियबाधा ॥३॥
नामा म्हणे गोविंद स्मरें तूं सावध ।
नव्हे तुज बाधा नाना विघ्नें ॥४॥
१२
मायेचीं भूचरे रज तम सात्त्विक ।
रामनाम एक सोडवणें एक ॥१॥
राम हेंचि स्नान राम हेंचि ध्यान ।
नामें घडती यज्ञ कोटी देवा ॥२॥
न लगती साधनें नाना मंत्र विवेक ।
रामनामीं मुख रंगवी कां रे ॥३॥
नामा म्हणे श्रीराम हेंचि वचन आम्हां।
नित्य ते पौर्णिमा सोळा कळी ॥४॥
१३
माझें मी करितां गेले हे दिवस ।
न धरीच विश्वास राम नामीं ॥१॥
अंतीं तुज उद्धरती राम कृष्ण हरी ।
राम पंचाक्षरी मंत्रसार ॥२॥
कां करिशी सांठा प्रपंच विस्तार।
न तुटे येरझार नामेंविण ॥३॥
नामा म्हणे ऐसें रामनामीं पिसें ।
तो उद्धरेल आपैसें इहलोकीं ॥४॥
१४
नको नको माया सांडीं लवलाह्या ।
पुढील उपाया झोंबें कां रे ॥१॥
राम नाम म्हणे तुटेल बंधन ।
भावबंधमोचन एक्या नामें ॥२॥
स्मरतां पतित उद्धरेल यतार्थ ।
नाम हाचि स्वार्थ तया झाला ॥३॥
नामा म्हणे हा जप करी तूं अमूप ।
नामें चुके खेप इये जनीं ॥४॥
१५
स्मरण करितां रामनामध्वनी ।
ऐकतांचि कर्णीं पळती यम ॥१॥
नामपाठ करा राम कृष्ण हरी ।
होतील कामारी ऋद्धि सिद्धि ॥२॥
साध्य तेंचि साधीं न करी उपाधी ।
जन्मांतरीच्या व्याधी हरती नामें ॥३॥
नामा म्हणे सर्व राम हाचि भाव ।
नाहीं आणिक देव रामेंविण ॥४॥
१६
रामकृष्णमाळा घालितां अढळ ।
तुटेल भवजाळ मायामोह ॥१॥
होशील तूं साधु न पावती बाधु ।
पूर्ण ब्रह्मानंदु तुष्टेल तुज ॥२॥
जपतां रामनाम पुरती सर्व काम ।
आदि अंति नेम साधेल तुज ॥३॥
नामा म्हणे कृतार्थ सर्व मनोरथ ।
न लगती ते अर्थ मायापाश ॥४॥
१७
शरीर संपत्ती मायेचें टवाळ ।
वायांचि पाल्हाळ मिरवितोसी ॥१॥
नाम हेचि तारी विठ्ठलनिर्धारीं ।
म्हणे हरी हरी एक वेळां ॥२॥
स्मरतां गोपाळनामा वंदितील यम ।
न लगती नेम मंत्रबाधा ॥३॥
नामा म्हणे सार मंत्र तो उत्तम ।
राम हेंचि नाम स्मरें कां रे ॥४॥
१८
कृष्णकथा संग जेणें तुटे पांग ।
न लगे तुज उद्योग करणें कांहीं ॥१॥
समर्थ सोयरा राम हा निधान ।
जनीं जनार्दनीं एक ध्यायी ॥२॥
नामा म्हणे उच्चार रामकृष्ण सार ।
तुटेल येरझार भवाब्धीची ॥३॥
१९
भवाब्धीतारक रामकृष्ण नांव ।
रोहिणीची माव सकळ दिसे ॥१॥
नाम हेंचि थोर नाम हेंचि थोर ।
वैकुंठीं बिढार रामनामें ॥२॥
राम हे निशाणी जपतांची अढळ ।
वैकुंठ तात्काळ तया जीवा ॥३॥
नामा म्हणे वैकुंठ नामेंचि जोडेल ।
अंतीं तुज पावेल राम एक ॥४॥
२०
जळाचा जळबिंदु जळींच तो विरे ।
तैसें हें विधारे पांचाठायीं ॥१॥
जीव शिव विचार नाम हें मधुर ।
जिव्हेसी उपचार रामनाम ॥२॥
रामनाम तारक शिव षडक्षरी ।
तैची वाचा करीं अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे ध्यान शिवाचें उत्तम ।
मंत्र हा परम  रामनाम ॥४॥
२१
करितां हरिकथा नाम सुखराशी ।
उद्धरी जीवासी एका नामें ॥१॥
तें हें रामनाम जपे तूं सप्रेम ।
जप हा सुगम सुफळ सदा ॥२॥
नामेंचि तरले नामेंचि पावले ।
नाम म्हणतां गेले वैकुंठासी ॥३॥
नामा म्हणे एका नामेंसी विनटे ।
ते वैकुंठींचे पेठे पावले देखा ॥४॥
२२
नामावांचूनि कांहीं दुकें येथें नाहीं ।
वेगीं लवलाहीं राम जपा ॥१॥
गोविंद गोपाळ वाचेसी रसाळ ।
पावसी केवळ निजपद ॥२॥
धृव प्रल्हाद बळी अंबऋषि प्रबुद्ध ।
नामेंचि चित्पद पावले देख ॥३॥
नामा म्हणे राम वाचे जपा नाम ।
संसार भवभ्रम हरे नामें ॥४॥
२३
म्हणतां वाचे नाम वंदी तया यम ।
काळादिक सम वंदी तया ॥१॥
ऐसें नाम श्रेष्ठ सकळांसी वरिष्ठ ।
उच्चारितां नीट वैकुंठ गाजे ॥२॥
तो हा नाममहिमा वाखाणीत ब्रह्मा।
न कळे तया उपमा आदिअंतीं॥ ३॥
नामा म्हणे पाठें नामाचेनि वाटें ।
तरी प्रत्यक्ष भेटे विठ्ठल हरी ॥४॥
२४
विष्णुनाम श्रेष्ठ गाती देवऋषी ।
नाम अहर्निशी गोपाळाचें ॥१॥
हरी हरि हरि हरि तूंचि बा श्रीहरि ।
असे चराचरीं जनार्दना ॥२॥
आदिब्रह्म हरि आळवी त्रिपुरारी ।
उमेप्रति करी उपदेश ॥३॥
नामा म्हणे नाम महाजप परम ।
शंकरासी नेम दिनदिशीं ॥४॥
२५
कां करतोसी सीण वाचे नारायण ।
जपतां समाधान होईल तुज ॥१॥
राम कृष्ण हरी नारायण गोविंद ।
वाचेसी हा छंद नामपाठ ॥२॥
वंदील तो यम कळिकाळ सर्वदा ।
न पावसी आपदा असत देही ॥३॥
नामा म्हणे ओळंग शीण झाला संगें ।
प्रपंच वाउगे सांडी परते ॥४॥
२६
नामाचेनि पाठे जातील वैकुंठें ।
तो पुंडलीक पेठे प्रकट असे ॥१॥
विठ्ठल हा मंत्र सांगतसे शास्त्र ।
आणिक नाही शस्त्र नामाविण ॥२॥
पुराण व्युत्पत्ति न लगती श्रुती ।
मुनि हरिपंथी गेले ॥३॥
नामा म्हणे हरी नामेंचि उद्धरी ।
जन्माची येरझारी हरे नामें ॥४॥
२७
सर्वांभूतीं भजें नमन करीं संता ।
नित्य त्या अच्युता स्मरण करी ॥१॥
ऐसी भजनी विनट सांपडेल वाट ।
रामकृष्ण नीट वैकुंठींची ॥२॥
न लगतीं साधनें वायाचि बंधन ।
हरिनामपंथीं जाण मुनि गेले ॥३॥
नामा म्हणे थोर नामचि साधार ।
वैकुंठीं बिढार तयां भक्‍ता ॥४॥
२८
तूं तव नेणता परि हरि तो जाणता ।
आहे तो समता सर्वां भूतीं ॥१॥
सर्वब्रह्म हरि एकचि निर्धारी ।
होशी झडकरी ब्रह्म तूंचि ॥२॥
अच्युत माधव अमृताच्या पाठें ।
लागतांचि वाते वंदी यम ॥३॥
नामा म्हणे होशी जिवलग विष्णूचा ।
दास त्या हरीचा आवडता ॥४॥
२९
कां करिसी सोस मायेचा असोस ।
नव्हे तुझा सौरस नामेंविण ॥१॥
नामचेचि मंत्र नामचेचि तंत्र ।
नामविण पवित्र न होती देखा ॥२॥
तिहीं लोकीं काहीं नामेंविण सर्वथा ।
अच्युत म्हणतां पुण्यकोटी ॥३॥
नामा म्हणे ब्रह्म आदि अंतीं नेम ।
तें विटेवरी सम उभें असे ॥४॥
३०
पवित्र परिकर हा उच्चार ।
उद्धरण साचार जगासी या ॥१॥
गोविंद केशव उच्चारीं श्रीराम ।
न लगती नेम अमूप जप ॥२॥
तें हें विठ्ठलरूप पिकलें पंढरीं ।
नाम चराचरीं विठ्ठल ऐसें ॥३॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वांत सखोल ।
उच्चारितां मोल न लगे तुज ॥४॥
३१
पोशिसी शरीर इंद्रियांची बाधा ।
शेखीं तें आपदा करील तुज ॥१॥
नव्हे तुझें हित विषय पोषितां ।
हरी हरी म्हणतां उद्धरसी ॥२॥
वायांचि पाल्हाळ चरित्रु सांगसी ।
परी नाम न म्हणसी अरे मूढा ॥३॥
नामा म्हणे हेचि पंढरीये निधान ।
उच्चारिता जन तरले ऐसें ॥४॥
३२
विषय खटपट आचार सांगसी ।
विठ्ठल न म्हणसी अरे मूढा ॥१॥
पूर्णब्रह्म हरी विठ्ठल श्रीहरी ।
अंतीं हा निर्धारीं तारील सत्य ॥२॥
न लगे सायास करणें उपवास ।
नामाचा विश्वास ऐसा धरीं ॥३॥
नामा म्हणे प्रेम धरीं सप्रेम ।
विठ्ठल हाचि नेम दिनदिशीं ॥४॥
३३
नव्हे तुज हित म्हणतां विषय पोषिता ।
हरी हरी म्हणतां तरशील ॥१॥
माधव श्रीहरी कृष्ण नरहरी ।
वेगीं हें उच्चारीं लवलाहीं ॥२॥
घडतील यज्ञ पापें भग्न होत ।
प्रपञ्च सर्वत्र होईल ब्रह्म ॥३॥
नामा म्हणे हरिकथा हरी भवव्यथा ।
उद्धरसी सर्वथा भाक माझी ॥४॥
३४
उपदेश सुगम आइके रे एक ।
नाम हें सम्यक विठ्ठलाचें ॥१॥
जनीं जनार्दन भावचि संपन्न ।
विठ्ठल उद्धरण कलीमाजीं ॥२॥
साधेल निधान पुरेल मनोरथ ।
नामेंचि कृतार्थ होसी जनी ॥३॥
नामा म्हणे नाम घेई तूं झडकरी ।
पावशी निर्धारीं वैकुंठपद ॥४॥
Translation - भाषांतर

N/A
Details
N/A
Created by TransLiteral/ Courtsey {Khapre.org} on 2007-01-29T00:41:00.0000000Z
|-|-|
Comments | अभिप्राय