श्री निवृत्ति महाराज हरिपाठ
१
हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं ।
अखंड श्रीपती नाम वाचे ॥ १॥
रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती ।
नित्य नामें तृप्ती जाली आम्हां ॥ २॥
नामाचेनि स्मरणें नित्य पैं सुखांत ।
दुजीयाची मात नेणो आम्ही ॥ ३॥
निवृत्ति जपतु अखंड नामावळी ।
हृदयकमळीं केशीराज ॥ ४॥
२
हरिविण चित्तीं न धरीं विपरीत ।
तरताती पतित रामनामें ॥ १॥
विचारुनी पाहा ग्रंथ हे अवघे ।
जेथें तेथें सांग रामनाम ॥ २॥
व्यासादिक भले रामनामापाठीं ।
नित्यता वैकुंठीं तयां घर ॥ ३॥
शुकादिक मुनि विरक्त संसारीं ।
रामनाम निर्धारीं उच्चारिलें ॥ ४॥
चोरटा वाल्मीकि रामनामीं रत ।
तोही एक तरत रामनामीं ॥ ५॥
निवृत्ति साचार रामनामी दृढ ।
अवघेचि गूढ उगविले ॥ ६॥
३
हरिमार्ग सार येणेंचि तरिजे ।
येरवीं उभिजे संसार रथ ॥ १॥
जपतां श्रीहरी मोक्ष नांदे नित्य ।
तरेल पैं सत्य हरि नामें ॥ २॥
काय हें ओखद नामनामामृत ।
हरिनामें तृप्त करी राया ॥ ३॥
निवृत्ति साचार हरिनाम जपत ।
नित्य हृदयांत हरी हरी ॥ ४॥
४
एकेविण दुजें नाहीं पैं ये सृष्टी ।
हें ध्यान किरीटी दिधलें हरी ॥ १॥
नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला ।
द्वैताचा अबोला तया घरीं ॥ २॥
हरीविणें देवो नाहीं नाहीं जनीं ।
अखंड पर्वणी हरी जपतां ॥ ३॥
निवृत्ति साकार हरिनाम पाठ ।
नित्यता वैकुंठ हरिपाठ ॥ ४॥
५
जपतां कुंटिणी उतरे विमान ।
नाम नारायण आलें मुखा ॥ १॥
नारायण नाम तारक तें आम्हां ।
नेणों पैं महिमा अन्य तत्त्वीं ॥ २॥
तरिले पतित नारायण नामें ।
उद्धरिले प्रेमें हरिभक्त ॥ ३॥
निवृत्ति उच्चार नारायण नाम ।
दिननिशी प्रेम हरी हरी ॥ ४॥
६
एक तत्त्व हरि असे पैं सर्वत्र ।
ऐसें सर्वत्र शास्त्र बोलियलें ॥ १॥
हरिनामें उद्धरे हरिनामें उद्धरें ।
वेगीं हरि त्वरें उच्चारी जो ॥ २॥
जपता पैं नाम यमकाळ कांपे ।
हरी हरी सोपें जपिजे सुखें ॥ ३॥
निवृत्ति म्हणे हरिनामपाठ जपा ।
जन्मांतर खेपा अंतरती ॥ ४॥
७
गगनींचा घन जातो पैं वारेन ।
अवचिता पतन अधोपंथें ॥ १॥
अध ऊर्ध्व हरि भाविला दुसरी ।
प्रपंचबोहरी आपोआप ॥ २॥
निवृत्ति म्हणे जन हरीचें स्वरूप ।
कळाचें पैं माप हरिनाम ॥ ३॥
८
सृष्टीच्या संमता सुरतरु तरु ।
बोलिला विस्तारु धर्मशास्त्रीं ॥ १॥
नेघों हें तरु प्रपंचपरिवारु ।
प्रत्यक्ष ईश्वरू पुरे आम्हा ॥ २॥
निवृत्ति निवांत हरीच सेवित ।
दो अक्षरीं उचित इंद्रिया ॥ ३॥
९
सर्वांभूतीं दया शांती पैं निर्धार ।
योग साचार जनीं इये ॥ १॥
न लगे मुंडण काया हें दंडणें ।
अखंड कीर्तन स्मरे हरी ॥ २॥
शिव जाणें जीवीं रक्षला चैतन्य ।
हे जीवीं कारुण्य सदा भावीं ॥ ३॥
गगनीं सूर्य तपे अनंत तारा लोपे ।
एकची स्वरूपें आत्मा तैसा ॥ ४॥
उगवला कळीं उल्हासु कमळीं ।
तैसा तो मंडली चंद्र लेखा ॥ ५॥
निवृत्तिमंडळ अमृत सकळ ।
घेतलें रसाळ हरिनाम ॥ ६॥
१०
जयाचेनि सुखें चळत पैं विश्व ।
नांदे जगदीश सर्वा घटीं ॥ १॥
त्याचें नाम हरी त्याचें नाम हरी ।
प्रपंचबोहरी कल्पनेची ॥ २॥
शांति त्याची नारी प्रकृति विकारी ।
उन्मनी बोवरी हृदयांतु ॥ ३॥
निवृत्तिदेवीं साधिली राणीव ।
हरपले भाव इंद्रियांचे ॥ ४॥
११
हरीविण भावो वायांचि संदेहो ।
हरि देवो देवो आहे सत्य ॥ १॥
हरी हरी वाचे ऐसें जपा साचें ।
नाहीं त्या यमाचे मोहजाळ ॥ २॥
हरीविण सार नाहीं पैं निर्धार ।
हरिविण पार न पाविजे ॥ ३॥
निवृत्ति श्रीहरि चिंती निरंतरीं ।
हरि एक अंतरीं सर्वीं नांदे ॥ ४॥
१२
ध्यान धरा हरी विश्रांति नामाची ।
विठ्ठलींच साची मनोवृत्ति ॥ १॥
ध्यानेविण मन विश्रांतिविण स्थान ।
सूर्याविण गगन शून्य दिसे ॥ २॥
नलगे साकार विठ्ठल मनोवृत्ति ।
प्रपंच समाप्ति ती अक्षरीं ॥ ३॥
निवृत्ति समता विठ्ठल कीर्तन ।
करितां अनुदीन मन मेळे ॥ ४॥
१३
प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज ।
आम्हां बोलता लाज येत सये ॥ १॥
काय करूं हरी कैसां हा गवसे ।
चंद्रसूर्य अंवसे एकसूत्र ॥ २॥
तैसें करूं मन निरंतर ध्यान ।
उन्मनी साधन आम्हां पुरे ॥ ३॥
निवृत्ति हरिपाठ नाम हेंचि वाट ।
प्रपंच फुकट दिसे आम्हां ॥ ४॥
१४
लटिका संसार वाढविसी व्यर्थ ।
विषयाचा स्वार्थ क्षणें करीं ॥ १॥
नको शिणों दुःखे का भरिसी शोकें ।
एकतत्त्वें एकें मन लावीं ॥ २॥
लावीं उन्मनीं टाळी टाळिसी नेई बाळी ।
अखंड वनमाळी हृदयवटी ॥ ३॥
निवृत्ति चपळ राहिला अचळ ।
नाहीं काळ वेळ भजतां हरी ॥ ४॥
१५
कल्पना काजळी कल्पिले कवळी ।
कैसेनि जवळीं देव होय ॥ १॥
टाकी हे कल्पना दुरित वासना ।
अद्वैत नारायणा भजें कां रे ॥ २॥
मोहाच्या जीवनीं नको करूं पर्वणी ।
चिंती कां आसनीं नारायण ॥ ३॥
निवृत्ति अवसरु कृष्णनाम पैं सारु ।
कल्पना साचारु हरी झाला ॥ ४॥
१६
मोहाचेनि देठें मोहपाश गिळी ।
कैसेनि गोपाळीं सरता होय ॥ १॥
मोहाचेनि मोहनें चिंतितां श्रीहरी ।
वाहिजु भीतरीं अवघा होय ॥ २॥
दिननिशीं नाम जपतां श्रीहरीचें ।
मग या मोहाचें मोहन नाहीं ॥ ३॥
निवृत्ति आगम मोहन साधन ।
सर्व नारायण एका तत्त्वें ॥ ४॥
१७
तिमिरपडळें प्रपंच हा भासे ।
झाकोळला दिसे आत्मनाथ ॥ १॥
हरीविण दुजें चिंतितां निभ्रांत ।
अवघेंचि दिसत माया भ्रम ॥ २॥
सांडूनि तिमिर सर्व नारायण ।
हेंचि पारायण नित्य करी ॥ ३॥
निवृत्ति सज्जन अवघा आत्मराज ।
एकतत्त्व बीज नाम लाहो ॥ ४॥
१८
प्रवृत्ति निवृत्ति या दोन्ही जनीं ।
वनीं काज करुनी असती ॥ १॥
नारायण नाम जपतांचि दोन्ही ।
एकतत्त्वीं करणी सांगिजे गुज ॥ २॥
आशेचे विलास गुंफोनिया महिमा ।
सत्त्वीं तत्त्व सीमा निजज्ञाने ॥ ३॥
निवृत्ति तत्त्वतां मनाचे मोहन ।
नित्य समाधानें रामनामें ॥ ४॥
१९
क्षेत्राचा विस्तार क्षेत्रज्ञवृत्ति ।
अवघी हे क्षिती एकरूपें ॥ १॥
शांति दया पैसे क्षमा जया रूप ।
अवघेची स्वरूप आत्माराम ॥ २॥
निंदा द्वेष चेष्टा अभिमान भाजा ।
सांडूनियां भजा केशवासी ॥ ३॥
निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्त ।
अवघींच समस्त गिळियेलीं ॥ ४॥
२०
आम्ही चकोर हरि चंद्रमा ।
आम्ही कळा तो पौर्णिमा ॥ १॥
कैसा बाहिजु भीतरी हरी ।
बिंब बिंबला एक सूत्रीं ॥ २॥
आम्ही देही तो आत्मा ।
आम्ही विदेही तो परमात्मा ॥ ३॥
ऐक्यपणें सकळ वसे ।
द्वैतबुद्धी कांहीं न दिसे ॥ ४॥
निवृत्ति चातक इच्छिताहे ।
हरिलागीं बरें तें पाहे ॥ ५॥
२१
ज्याचे मुखीं नाम अमृतसरिता ।
तोचि एक पुरता घटु जाणा ॥ १॥
नामचेनि बळे कळिकाळ आपणा ।
ब्रह्मांडा येसणा तोचि होय ॥ २॥
न पाहे तयाकडे काळ अवचिता ।
नामाची सरिता जया मुखीं ॥ ३॥
निवृत्ति नामामृत उच्चारी रामनामे ।
नित्य परब्रह्म त्याचे घरीं ॥ ४॥
२२
नित्य नाम वाचे तोचि एक धन्य ।
त्याचें शुद्ध पुण्य इये जनीं ॥ १॥
रामनामकीर्ति नित्य मंत्र वाचे ।
दहन पापाचें एका नामें ॥ २॥
ऐसा तो नित्यता पुढे तत्त्व नाम ।
नाहीं तयासम दुजें कोणी ॥ ३॥
निवृत्ति अव्यक्त रामनाम जपे ।
नित्यता पैं सोपें रामनाम ॥ ४॥
२३
अखंड जपतां रामनाम वाचे ।
त्याहूनी दैवाचे कोण भूमी ॥ १॥
अमृतीं राहिले कैचें मरण ।
नित्यता शरण हरिचरणा ॥ २॥
नाममंत्र रासी अनंत पुण्य त्यासी ।
नाहीं पैं भाग्यासी पार त्याच्या ॥ ३॥
निवृत्ति म्हणे सार रामनाम मंत्र ।
कैंचा त्यासी शत्रु जिती जनीं ॥ ४॥
२४
नाम नाहीं वाचे तो नर निर्दैव ।
कैसेनि देव पावेल तया ॥ १॥
जपे नाम वाचें रामनाम पाठें ।
जाशील वैकुंठे हरी म्हणता ॥ २॥
न पाहे पैं दृष्टीं कळिकाळ तुज ।
रामनाम बीज मंत्रसार ॥ ३॥
निवृत्ति म्हणे नाम जपावें नित्यता ।
आपणचि तत्त्वतां होईल हरी ॥ ४॥
२५
नामाचेनि बळें तारिजे संसार ।
आणिक विचार करूं नको ॥ १॥
नाम जप वेगीं म्हणे हरी हरी ।
प्रपंच बोहरी आपोआप ॥ २॥
नित्यता भजन देवद्विज करी ।
नाम हे उच्चारि रामराम ॥ ३॥
निवृत्ति जपतु राम राम वाचे ।
दहन पापाचें आपोआप ॥ ४॥
Translation - भाषांतर
N/A