{khapre.org}
Nothing More : Nothing Less : Just Perfect : Online Since 1997
Header

श्रीमनाचे श्लोक




श्रीसमर्थ रामदास स्वामींचे श्रीमनाचे श्लोक, श्रीसमर्थांचे हे मनाचे श्र्लोक अतिशय सोपे आहेत. मनाला आवरुन रामरूपाच्या ठायी समरसून जावे व मुक्तीचा सुखसोहळा भोगावा अशी श्रीसमर्थांची या श्र्लोकांच्या रूपाने शिकवण आहे. वाचकांनी ही २०५ मोत्यांची माळ कंठात अखंड ठेवावी व कृतार्थ व्हावे.
Manache Shlok By Ramadas Swami. They teach you how to control your mind and spirit spiriually towards Lord Rama.

Content
श्रीमनाचे श्लोक

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।

मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा ॥

नमू शारदा मूळ चत्वार वाचा ।

गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥

जनी निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें ।

जनीं वंद्य तें सर्व भावें करावें ॥ २ ॥

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ।

पुढें वैखरी राम आधीं वदावा ॥

सदाचार हा थोर सोडूं नये तो ।

जनीं तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥

मना वासना दुष्ट कामा न ये रे ।

मना सर्वथा पाप बुद्धी नको रे ॥

मना धर्मता नीति सोडूं नको हो ।

मना अंतरी सार विचार राहो ॥ ४॥

मना पापसंकल्प सोडूनि द्यावा ।

मना सत्यसंकल्प जीवीं धरावा ॥

मना कल्पना ते नको वीषयांची ।

विकारें घडे हो जनीं सर्व ची ची ॥ ५ ॥

नको रे मना क्रोध हा खेदकारी ।

नको रे मना काम नाना विकारी ॥

नको रे मना लोभ हा अंगिकारू ।

नको रे मना मत्सरू दंभ भारू ॥ ६ ॥

मना श्रेष्ठ धारिष्ट जीवीं धरावें ।

मना बोलणें नीच सोशीत जावें ॥

स्वयें सर्वदा नम्र वाचे वदावें ।

मना सर्व लोकांसि रे नीववावें ॥ ७ ॥

देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।

मना सज्जना हेचि क्रीया धरावी ॥

मना चंदनाचेपरी त्वां झिजावें ।

परी अंतरी सज्जना नीववावें ॥ ८ ॥

नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें ।

अति स्वार्थबुद्धि न रे पाप सांचे ॥

घडे भोगणें पाप तें कर्म खोटें ।

न होतां मनासरिखें दु:ख मोठें ॥ ९ ॥

सदा सर्वदा प्रीति रामॆं धरावी ।

दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी ॥

देहेदु:ख तें सुख मानीत जावें ।

विवेकें सदा सस्वरूपीं भरावें ॥ १० ॥

जनीं सर्व सूखी असा कोण आहे ।

विचारें मना तुंचि शोधूनि पाहें ॥

मना त्वांचि रे पूर्वसंचीत केलें ।

तयासारिखें भोगणें प्राप्त झालें ॥ ११ ॥

मना मानसीं दु:ख आणूं नको रे ।

मना सर्वथा शोक चिंता नको रे ।

विवेकें देहेबुद्धि सोडून द्यावी ।

विदेहीपणें मुक्ति भोगीत जावी ॥ १२ ॥

मना सांग पां रावणा काय जालें ।

अकस्मात तें राज्य सर्वे बुडालें ॥

म्हणोनि कुडी वासना सांडि वेगीं ।

बळें लागला काळ हा पाठिलागीं ॥ १३॥

जिवा कर्मयोगे जनी जन्म जाला ।

परी शेवटीं काळमूखीं निमाला ॥

महाथोर ते मृत्युपंथेचि गेले ।

कितीएक ते जन्मलें आणि मेलॆ ॥ १४ ॥

मना पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।

जितां बोलती सर्वही जीव मी मी ॥

चिरंजीव हे सर्वही मानिताती ।

अकस्मात सांडूनियां सर्व जाती ॥ १५ ॥

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे।

अकस्मात तोही पुढे जात आहे ॥

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्यातें ।

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेतें ॥ १६ ॥

मनीं मानव व्यर्थ चिंता वहातें ।

अकस्मात होणार होऊनि जातें ॥

घडे भोगणें सर्वही कर्मयोगें ।

मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥ १७ ॥

मना राघवेंवीण आशा नको रे ।

मना मानवाची नको कीर्ति तूं रे ॥

जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें ।

तया वर्णितां सर्वही श्र्लाघ्यवाणें ॥ १८ ॥

मना सर्वथा सत्य सांडू नको रे ।

मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे ।

मना सत्य तें सत्य वाचे वदावें ।

मना मिथ्य तें सोडूनि द्यावें ॥ १९ ॥

बहू हिंपुटी होइजे मायपोटीं ।

नको रे मना यातना तेचि मोठी ॥

निरोधें पचे कोंडिलें गर्भवासि ।

अधोमूख रे दु:ख त्या बाळकासी ॥ २० ॥

मना वासना चूकवीं येरझारा ।

मना कामना सांडि रे द्रव्यदारा ॥

मना यातना थोर हे गर्भवासी ॥

मना सज्जना भेटवीं राघवासी ॥ २१ ॥

मना सज्जना हीत माझें करावें ।

रघूनायका दृढ चित्ती धरावें ॥

महाराज तो स्वामी वायूसुताचा ।

जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा ॥ २२ ॥

न बोलें मना राघवेंवीण कांही ।

जनीं वाउगें बोलतां सूख नाहीं ॥

घडीनें घडी काळ आयुष्य नेतो ।

देहांती तुला कोण सोडूं पहातो ॥ २३ ॥

रघूनायकावीण वायां शिणावें ।

जनासारिखें व्यर्थ कां वोसणावें ॥

सदासर्वदा नाम वाचे वसों दे ।

अहंता मनीं पापिणी ते नसों दे ॥ २४ ॥

मना वीट मानूं नको बोलण्याचा ।

पुढें मागुता राम जोडेल कैंचा ॥

सुखाची घडी लोटतां सूख आहे ।

पुढें सर्व जाईल कांहीं न राहे ॥ २५ ॥

देहेरक्षणाकारणें यत्न केला ।

परी शेवटीं काळ घेऊनि गेला ॥

करीं रे मना भक्ति या राघवाची ।

पुढें अंतरी सोडिं चिंता भवाची ॥ २६ ॥

भवाच्या भये काय भीतोस लंडी ।

धरीं रे मना धीर धाकासि सांडीं ॥

रघूनायकासारिखा स्वामि शीरीं ।

नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ॥ २७ ॥

दिनानाथ हा राम कोदंडधारी ।

पुढें देखतां काळ पोटीं थरारी ॥

मना वाक्य नेमस्त हें सत्य मानीं ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २८ ॥

पदीं राघवाचे सदा ब्रीद गाजे ।

बळें भक्तरीपूशिरीं कांबि वाजे ॥

पुरी वाहिली सर्व जेणें विमानीं ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ २९ ॥

समर्थाचिया सेवका वक्र पाहे ।

असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥

जयाची लीला वर्णिती लोक तीन्ही ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३० ॥

महासंकटी सोडिले देव जेणें ।

प्रतापें बळें आगळा सर्वगूणें ॥

जयातें स्मरे शैलजा शूलपाणी ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥

अहल्या शिळा राघवें मुक्त केली ।

पदीं लागतां दिव्य होऊनि गेली ॥

जया वर्णिता शीणली वेदवाणी ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३२ ॥

वसे मेरूमांदार हे सृष्टिलीळा ।

शशी सूर्य तारांगणें मेघमाळा ॥

चिरंजीव केले जनीं दास दोन्ही ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३३ ॥

उपेक्षा कदा रामरूपी असेना ।

जिवां मानवां निश्चयो तो वसेना ॥

शिरीं भार वाहेन बोले पुराणीं ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३४ ॥

असे हो जया अंतरी भाव जैसा ।

वसे हो तया अंतरी देव तैसा ॥

अनन्यासि रक्षीतसे चापपाणी ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३५ ॥

सदा सर्वदा देव सन्निध आहे ।

कृपाळूपणें अल्प धारिष्ट पाहे ॥

सुखानंद - आनंद - कैवल्यदानी ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३६ ॥

सदा चक्रवाकासि मार्तंड जैसा ।

उडी घालितो संकटीं स्वामी तैसा ॥

हरिभक्तिचा घाव गाजे निशाणीं ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३७ ॥

मना प्रार्थना तुजला एक आहे ।

रघूनाथ थक्कीत होऊन पाहे ॥

अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे ।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ३८ ॥

जया वर्णिती वेद शास्त्रें पुराणें ।

जयाचेनि योगें समाधान बाणे ॥

तयालागिं हें सर्व चांचल्य दीजे ।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ३९ ॥

मना पाविजे सर्वही सूख जेथें ।

अती आदरें ठेविंजे लक्ष तेथें ॥

विवेकें कुडी कल्पना पालटींजे ।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४० ॥

बहू हिंडता सौख्य होणार नाहीं ।

शिणावें परी नातुडे हीत कांहीं ॥

विचारें बरें अंतरा बोधवींजे ।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४१ ॥

बहूतांपरी हेंचि आतां धरावें ।

रघूनायका आपुलेसे करावें ॥

दिनानाथ हें तोडरीं ब्रीद गाजे ।

मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥ ४२ ॥

मना सज्जना एक जीवीं धरावें ।

जनीं आपुलें हीत तूवां करावें ॥

रघूनायकावीण बोलों नको हो ।

सदा मानसीं तो निजध्यास राहो ॥४३॥

मना रे जनीं मौनमुद्रा धरावी ।

कथा आदरें राघवाची करावी ॥

नसे राम तें धाम सोडूनि द्यावें ।

सुखालागिं आरण्य सेवीत जावें ॥ ४४ ॥

जयाचेनी संगे समाधान भंगे ।

अहंता अकस्मात येऊनि लागे ॥

तये संगतीची जनीं कोण गोडी ।

जिये संगतीनें मती राम सोडी ॥ ४५ ॥

मना जे घडी राघवेंवीण गेली ।

जनीं आपुली ते तुवां हानि केली ॥

रघूनायकावीण तो शीण आहे ।

जनीं दक्ष तो लक्ष लावूनी पाहे ॥ ४६ ॥

मनीं लोचनीं श्रीहरी तोची पाहे ।

जनीं जाणता भक्त होऊनि राहे ॥

गुणीं प्रीति राखे क्रमू साधनाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४७ ॥

सदा देवकाजीं झिजे देह ज्याचा ।

सदा रामनामें वदे नित्य वाचा ॥

स्वधर्मेचि चाले सदा उत्तमाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४८ ॥

सदा बोलण्यासारिखें चालताहे ।

अनेकीं सदा एक देवासि पाहे ॥

सगूणीं भजे लेश नाहीं भ्रमाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ४९ ॥

नसे अंतरी कामकारी विकारी ।

उदासीन जो तापसी ब्रह्मचारी ॥

निवाला मनीं लेश नाहीं तमाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५० ॥

मदे मत्सरे सांडिला स्वार्थबुद्धि ।

प्रपंचीक नाहीं जयातें उपाधी ॥

सदा बोलणें न्रम वाचा सुवाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५१ ॥

क्रमी वेळ जो तत्त्वचिंतानुवादें ।

न लिंपे कदा दंभ वादें विवादें ॥

करी सूखसंवाद जो ऊगमाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५२ ॥

सदा आर्जवी प्रीय जो सर्व लोकीं ।

सदा सर्वदा सत्यवादी विवेकी ॥

न बोले कदा मिथ्य वाचा त्रिवाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५३ ॥

सदा सेवि आरण्य तारुण्यकाळी ।

मिळेना कदा कल्पनेचेनि मेळीं ॥

चळेना मनीं निश्चयो दृढ ज्याचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५४ ॥

नसे मानसीं नष्ट वाशा दुराशा ।

वसे अंतरीं प्रेमपाशा पिपाशा ॥

ऋणी देव हा भक्तिभावें जयाचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५५ ॥

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू ।

स्नेहाळू कृपाळू जनीं दासपाळू ॥

तया अंतरी क्रोध संताप कैंचा ।

जगीं धन्य तो दास सर्वोत्तमाचा ॥ ५६ ॥

जगीं होइजे धन्य या रामनामें ।

क्रिया भक्ति ऊपासना नित्य नेमें ॥

उदासीनता तत्त्वता सार आहे ।

सदा सर्वदा मोकळी वृत्ति राहे ॥ ५७ ॥

नको वासना वीषयीं वृत्तिरूपें ।

पदार्थी जडे कामना पूर्वपापें ॥

सदा राम निष्काम चिंतीत जावा ।

मना कल्पनालेश तोही नसावा ॥ ५८ ॥

मना कल्पना कल्पितां कल्पकोटी ।

नव्हे रे नव्हे सर्वथा रामभेटी ॥

मनीं कामना राम नाहीं जयाला ।

अती आदरें प्रीति नाहीं तयाला ॥ ५९ ॥

मना राम कल्पतरू कामधेनू ।

निधी सार चिंतामणी काय वानूं ॥

जयाचेनि योगें घडे सर्व सत्ता ।

तया साम्यता कायसी कोण आतां ॥ ६० ॥

उभा कल्पवृक्षातळीं दु:ख वाहे ।

तया अंतरीं सर्वदा तेंचि राहे ।

जनीं सज्जनीं वाद हा वाढवावा ।

पुढे मागुता शोक जीवीं धरावा ॥ ६१ ॥

निजध्यास तो सर्व तूटोनि गेला ।

बळें अंतरीं शोक संताप ठेला ॥

सुखानंद आनंद भेदें बुडाला ।

मनीं निश्चयो सर्व खेदें उडाला ॥ ६२ ॥

घरीं कामधेनू पुढें ताक मागे ।

हरीबोध सांडूनि विवाद लागे ॥

करीं सार चिंतामणी काचखंडें ।

तया मागतां देत आहे उदंडें ॥ ६३ ॥

अती मूढ त्या दृढ बुद्धि असेना ।

अती काम त्या राम चित्तीं वसेना ॥

अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा ।

अती वीषयी सर्वदा दैन्यवाणा ॥ ६४ ॥

नको दैन्यवाणें जिणें भक्तिऊणें ।

अती मूर्ख त्या सर्वदा दु:ख दूणें ॥

धरीं रे मना आदरें प्रीति रामीं ।

नको वासना हेमधामीं विरामीं ॥ ६५ ॥

नव्हे सार संसार हा घोर आहे ।

मना सज्जना सत्य शोधूनि पाहें ॥

जनीं वीष खातां पुढें सूख कैचें ।

करीं रे मना ध्यान या राघवाचें ॥ ६६ ॥

घनश्याम हा राम लावण्यरूपी ।

महाधीर गंभीर पूर्णप्रतापी ॥

करी संकटीं सेवकाचा कुडावा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६७ ॥

बळें आगळा राम कोदंडधारी ।

महाकाळ विक्राळ तोही थरारी ॥

पुढें मानवा किंकरा कोण केवा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६८ ॥

सुखानंदकारी निवारीं भयातें ।

जनीं भक्तिभावें भजावें तयातें ॥

विवेकें त्यजावा अनाचार हेवा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ६९ ॥

सदा रामनामें वदा पूर्णकामें ।

कदा बाधिजेनापदा नित्य नेमें ॥

मदालस्य हा सर्व सोडोनि द्यावा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७० ॥

जयाचेनि नामें महादोष जाती ।

जयाचेनि नामें गती पाविजेती ॥

जयाचेनि नामें घंडे पुण्यठेवा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७१ ॥

न वेंचे कदा ग्रंथीचें अर्थ कांही ।

मुखे नाम उच्चारितां कष्ट नाहीं ॥

महाघोर संसार - शत्रू जिणावा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७२ ॥

देहेदंडणेचे महादु:ख आहे ।

महादु:ख तें नाम घेतां न राहे ॥

सदाशीव चिंतीतसे देवदेवा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७३ ॥

बहूतांपरी संकटे साधनांची ।

व्रतें दान उद्यापनें तीं धनाचीं ॥

दिनाचा दायाळु मनीं आठवावा ।

प्रभातें मनीं राम चिंतीत जावा ॥ ७४ ॥

समस्तामध्ये सार साचार आहे ।

कळेना तरी सर्व शोधूनि पाहें ।

जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७५ ॥

नव्हे कर्म ना धर्म ना योग कांहीं ।

नव्हे भोग ना त्याग ना सांग पाहीं ॥

म्हणे दास विश्वास नामीं धरावा ।

प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥ ७६ ॥

करी काम निष्काम या राघवाचें ।

करी रूप स्वरूप सर्वां जिवांचें ॥

करी छंद निर्द्वद्व हे गूण गातां ।

हरीकीर्तनीं वृत्तिविश्वास होतां ॥ ७७ ॥

अहो ज्या नरा रामविश्वास नाहीं ।

तया पामरा बाधिजे सर्व कांहीं ॥

महाराज तो स्वामि कैवल्यदाता ।

वृथा वाहणें देहसंसारचिंता ॥ ७८ ॥

मना पावना भावना राघवाची ।

धरीं अंतरीं सोडि चिंता भवाची ॥

भवाची जिवा मानवा भूली ठेली ।

नसे वस्तुची धारणा व्यर्थ गेली ॥ ७९ ॥

धरा श्रीवरा त्या हरा अंतरातें ।

तरा दुस्तरा त्या परा सागरातें ॥

सरा वीसरा त्या भरा दुर्भरातें ।

करा निकरा त्या खरा मत्सरातें ॥ ८० ॥

मना मत्सरें नाम सांडूं नको हो ।

अती आदरें हा निजध्यास राहो ॥

समस्तांमधे नाम हें सार आहे ।

दुजी तूळणा तूळितांही न साहे ॥ ८१ ॥

बहू नाम या रामनामीं तुळेना ।

अभाग्या नरा पामरा हें कळेना ॥

विषा औषध घेतलें पार्वतीशें ।

जिवा मानवा किंकरा कोण पूसे ॥ ८२ ॥

जेणे जाळिला काम तो राम घ्यातो ।

उमेसी अती आदरें गूण गातो ॥

बहू ज्ञान वैराग्य सामर्थ्य जेथें ।

परी अंतरी नामविश्वास तेथें ॥ ८३ ॥

विठोनें शिरी वाहिला देवराणा ।

तया अंतरी ध्यास रे त्यासि नेणा ॥

निवाला स्वयें तापसी चंद्रमौळी ।

जिवा सोडवी राम हा अंतकाळीं ॥ ८४ ॥

भजा राम विश्राम यो़गेश्वरांचा ।

जपू नेमिला नेम गौरीहराचा ॥

स्वयें नीववीं तापसी चंद्रमौळी ।

तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी ॥ ८५ ॥

मुखीं राम विश्राम तेथेंचि आहे ।

सदानंद आनंद सेवूनि राहे ॥

तयावीण तो शीण संदेहकारी ।

निजधाम हें नाम शोकापहारी ॥ ८६ ॥

मुखीं राम त्या काम बाधूं शकेना ।

गुणें इष्ट धारिष्ट त्याचें चुकेना ॥

हरीभक्त तो शक्त कामास मारी ।

जगीं धन्य तो मारूती ब्रह्मचारी ॥ ८७ ॥

बहू चांगलें नाम या राघवाचें ।

अती साजिरें स्वल्प सोपें फुकाचे ॥

करी मूळ निर्मूळ घेतां भवाचें ।

जिवां मानवा हेचिं कैवल्य साचें ॥ ८८ ॥

जनीं भोजनीं नाम वाचे वदावें ।

अती आदरें गद्यघोषें म्हणावें ॥

हरीचिंतनें अन्न सेवीत जावें ।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें ॥ ८९ ॥

न ये राम वाणी तया थोर हाणी ।

जनीं व्यर्थ प्राणी तया नाम काणी ॥

हरीनाम हें वेदशास्त्रीं पुराणी ।

बहू आगळें बोलिली व्यासवाणी ॥ ९० ॥

नको वीट मानू रघूनायकाचा ।

अती आदरें बोलिजे राम वाचा ॥

न वेंचे मुखीं सापडे रे फुकाचा ।

करीं घोष त्या जानकीवल्लभाचा ॥ ९१ ॥

अती आदरें सर्वही नामघोषें ।

गिरीकंदरीं जाइजे दूरि दोषें ॥

हरी तिष्ठतू तोषला नामतोषें ।

विशेषें हरा मानसीं रामपीसें ॥ ९२ ॥

जगीं पाहतां देव हा अन्नदाता ।

तया लागली तत्त्वता सार चिंता ॥

तयाचें मुखीं नाम घेतां फुकाचें ।

मना सांग पां रे तुझें काय वेंचे ॥ ९३ ॥

तिन्ही लोक जाळूं शके कोप येतां ।

निवाला हरू तो मुखें नाम घेतां ॥

जपे आदरें पार्वती विश्वमाता ।

म्हणोनी म्हणा तेंचि हें नाम आतां ॥ ९४ ॥

अजामेळ पापी वदे पुत्रकामें ।

तया मुक्ति नारायणाचेनि नामें ॥

शुकाकारणें कुंटणी राम वाणी ।

मुखें बोलतां ख्याति जाली पुराणीं ॥ ९५ ॥

महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळीं ।

जपे रामनामावळी नित्य काळीं ॥

पिता पापरूपी तया देखवेना ।

जनीं दैत्य तो नाम मूखें म्हणेना ॥ ९६ ॥

मुखीं नाम नाहीं तया मुक्ति कैंची ।

अहंतागुणें यातना ते फुकाची ॥

पुढें अंत येईल तो दैन्यवाणा ।

म्हणोनी म्हणा रे म्हणा देवराणा ॥ ९७ ॥

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।

बहू तारिले मानवदेहधारी ॥

तया रामनामीं सदा जो विकल्पी ।

वदेना कदा जीव तो पापरूपी ॥ ९८ ॥

जगीं धन्य वाराणसी पुण्यराशी ।

तयेमाजि जातां गती पूर्वजांसी ॥

मुखें रामनामावळी नित्यकाळीं ।

जिवा हीत सांगे सदा चंद्रमौळी ॥ ९९ ॥

यथासांग रे कर्म तेम्ही घडेना ।

घडे धर्म तों पुण्य गांठीं पडेना ॥

दया पाहतां सर्व भूतीं असेना ।

फुकाचें मुखीं नाम तेंही वसेना ॥ १०० ॥

जया नावडे नाम त्या येम जाची ।

विकल्पें उठे तर्क त्या नर्क ची ची ॥

म्हणोनी अती आदरें नाम घ्यावें ।

मुखें बोलतां दोष जाती स्वभावें ॥ १०१ ॥

अती लीनता सर्वभावें स्वभावें ।

जना सज्जनालागि संतोषवावें ॥

देहे कारणी सर्व लावीत जावें ।

सगूणी अती आदरेंसी भजावें ॥ १०२ ॥

हरिकिर्तनें प्रीति रामीं धरावी ।

देहेबुद्धि नीरूपणीं वीसरावी ॥

परद्रव्य आणीक कांता परावी ।

यदर्थी मना सांडि जीवीं करावी ॥ १०३ ॥

क्रियेवीण नानापरी बोलिजेतें ।

परी चित्त दुश्चीत तें लाजवीतें ॥

मना कल्पना धीट सैराट धांवे ।

तया मानवा देव कैसेनि पावे ॥ १०४ ॥

विवेकें क्रिया आपुली पालटावी ।

अती आदरें शुद्ध क्रीया धरावी ॥

जनीं बोलण्यासारिखें चाल बापा ।

मना कल्पना सोडिं संसारतापा ॥ १०५ ॥

बरी स्नानसंध्या करी एकनिष्ठा ।

विवेकें मना आवरी स्थानभ्रष्टा ॥

दया सर्वभूतीं जया मानवाला ।

सगा प्रेमळू भक्तिभावें निवाला ॥ १०६ ॥

मना कोपआरोपना ते नसावी ।

मना बुद्धि हे साधुसंगीं वसावी ॥

मना नष्ट चांडाळ तो संग त्यागीं ।

मना होइं रे मोक्षभागीं विभागी ॥ १०७ ॥

मना सर्वदा सज्जनाचेनि योगें ।

क्रीया पालटे भक्तिभावार्थ लागे ॥

क्रियेवीण वाचाळता ते निवारीं ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥

जनीं वादवेवाद सोडुनि द्यावा ।

जनीं सूखसंवाद सूखें करावा ॥

जगीं तोचि तो शोकसंतापहारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥

तुटे वाद संवाद त्यातें म्हणावें ।

विवेकें अहंभाव यातें जिणावें ॥

अहंतागुणें वाद नाना विकारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥

हिताकारणें बोलणें सत्य आहे ।

हिताकारणें सर्व शोधूनि पाहें ॥

हिताकारणें बंड पाखांड वारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥

जनीं सांगतां ऎकतां जन्म गेला ।

परी वादवेवाद तैसाचि ठेला ॥

उठे संशयो वाद हा दंभधारी ।

तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥

जनीं हीत पंडीत सांडित गेले ।

अहंतागुणें ब्रह्मराक्षस जाले ॥

तयाहूनि व्युत्पन्न तो कोण आहे ।

मना सर्व जाणीव सांडूनि राहें ॥ ११३ ॥

फुकाचें मुखीं बोलतां काय वेंचे ।

दिसेंदिस अभ्यंतरीं गर्व सांचे ॥

क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ।

विचारें तुझा तूंचि शोधूनि पाहें ॥ ११४ ॥

तुटे वाद संवाद तेथें करावा ।

विवेकें अहंभाव हा पालटावा ॥

जनीं बोलण्यासारिखें आचरावें ।

क्रियापालटें भक्तिपंथेचि जावें ॥ ११५ ॥

बहू श्रापितां कष्टला अंबऋषी ।

तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥

दिला क्षीरसिंधू तया ऊपमानी ॥

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११६ ॥

धुरू लेंकरू बापुडें दैन्यवाणें ।

कृपा भाक्र्ता दीधली भेटि जेणें ॥

चिरंजीव तारांगणीं प्रेमखाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११७ ॥

गजेंद्रू महासंकटी वास पाहे ।

तयाकारणे श्रीहरी धांवताहे ॥

उडी घातली जाहला जीवदानी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११८ ॥

अजामेळ पापी तया अंत आला ।

कृपाळूपणें तो जनी मुक्त केला ॥

अनाथासि आधार हा चक्रपाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ ११९ ॥

विधीकारणें जाहला मत्स्य वेगी ।

धरी कूर्मरूपें धरा पृष्ठभागी ॥

जना रक्षणाकारणें नीच योनी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२० ॥

महाभक्त प्रल्हाद हा कष्टवीला ।

म्हणोनी तयाकारणे सिंह जाला ॥

न ये ज्वाळ विशाळ संनीध कोणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२१ ॥

कृपा भाकिता जाहला वज्रपाणी ।

तयाकारणें वामनू चक्रपाणी ॥

द्विजांकारणे भार्गवू चापपाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२२ ॥

अहल्येसतीलागिं आरण्यपंथे ।

कुडावा पुढें देव बंदी तयांतें ॥

बळें सोडिता घाव घाली निशाणीं ।

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ १२३ ॥

तये द्रौपदीकारणें लागवेगें ।

त्वरें धांवतो सर्व सांडूनि मागें ॥

कळीलागि जाला असे बौद्ध मौनी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२४ ॥

अनाथा दिनांकारणें जन्मताहे ।

कलंदी पुढे देव होणार आहे ॥

जया वर्णितां शीणली वेदवाणी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥ १२५ ॥

जनाकारणें देव लीलावतारी ।

बहूतांपरी आदरें वेषधारी ॥

तया नेणती ते जन पापरूपी ।

दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी । १२६ ॥

जगीं धन्य तो रामसुखें निवाला ।

कथा ऎकतां सर्व तल्लीन झाला ॥

देहेभावना रामबोधें उडाली ।

मनोवासना रामरूपीं बुडाली ॥ १२७ ॥

मना वासना वासुदेवीं वसों दे ।

मना कामना कामसंगीं नसो दे ॥

मना कल्पना वाऊगी ते न कीजे ।

मना सज्जना सज्जनीं वस्ति कीजे ॥ १२८ ॥

गतीकारणें संगती सज्जनाची ।

मती पालटे सूमती दुर्जनाची ॥

रतीनायिकेचा पती नष्ट आहे ।

म्हणोनी मनातीत होऊनि राहें ॥ १२९ ॥

मना अल्प संकल्प तोही नसावा ।

सदा सत्यसंकल्प चित्तीं वसावा ॥

जनीं जल्प वीकल्प तोही त्यजावा ।

रमाकांत एकांतकाळी भजावा ॥ १३० ॥

भजाया जनीं पाहता राम एकू ।

करीं बाण एकू मुकीं शब्द एकू ॥

क्रिया पाहतां उद्धरे सर्व लोकू ।

धर जानकीनायकाचा विवेकू ॥ १३१ ॥

विचारूनि बोले विवंचूनि चाले ।

तयाचेनि संतप्त तेही निवाले ॥

बरें शोधिल्यावीण बोलों नको हो ।

जनीं चालणें शुद्ध नेमस्त राहो ॥ १३२ ॥

हरिभक्त वीरक्त विज्ञानराशी ।

जेणें मानसी स्थापिलें निश्चयासी ॥

तया दर्शनें स्पर्शनें पुण्य जोडे ।

तया भाषणें नष्ट संदेह मोडे ॥ १३३ ॥

नसे गर्व आंगी सदा वीतरागी ।

क्षमा शांति भो़गी दयादक्ष योगी ॥

नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा ।

इहीं लक्षणीं जाणिजे योगीराणा ॥ १३४ ॥

धरी रे मना संगती सज्जनाची ।

जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची ।

बळें भाव सद्‌बुद्धि सन्मार्ग लागे ।

महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥ १३५ ॥

भयें व्यापिलें सर्व ब्रह्मांड आहे ।

भयातीत तें संत आनंत पाहें ॥

जया पाहतां द्वैत कांही दिसेना ।

भय मानसीं सर्वथाही असेना ॥ १३६ ॥

जिवां श्रेष्ठ ते स्पष्ट सांगोनि गेले ।

परी जीव अज्ञान तैसेचि ठेले ॥

देहेबुद्धिचें कर्म खोटें टळेना ।

जुनें ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३७ ॥

भ्रमें नाडळे वित्त ते गुप्त जालें ।

जिवा जन्मदारिद्र ठाकूनि आलें ॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या टळेना ।

जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३८ ॥

पुढे पाहतां सर्वही कोंदलेंसे ।

अभाग्यास हें दृश्य पाषाण भासे ॥

अभावें कदा पुण्य गांठीं पडेना ।

जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥ १३९ ॥

जयाचें तया चूकलें प्राप्त नाहीं ।

गुणें गोविलें जाहलें दु:ख देहीं ॥

गुणावेगळी वृत्ति तेही वळेना ।

जुने ठेवणें मीपणें आकळेना ॥ १४० ॥

म्हणे दास सायास त्याचे करावे ।

जनीं जाणता पाय त्याचे धरावे ॥

गुरू-अंजनेंवीण तें आकळेना ।

जुने ठेवणें मीपणें ते कळेना ॥ १४१ ॥

कळेना कळेना कळेना ढळेना ।

ढळे नाढळे संशयोही ढळेना ॥

गळेना गळेना अहंता गळेना ।

बळे आकळेना मिळेना मिळेना ॥ १४२ ॥

अविद्यागुणें मानवा ऊमजेना ।

भ्रमें चुकलें हीत तें आकळेना ॥

परीक्षेविणें बांधिलें दृढ नाणें ।

परी सत्य मिथ्या असें कोण जाणे ॥ १४३ ॥

जगीं पाहतां साच तें काय आहे ।

अती आदरें सत्य शोधूनि पाहें ॥

पुढें पाहतां पाहतां देव जोडे ।

भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे ॥ १४४ ॥

सदा वीषयो चिंतितां जीव जाला ।

अहंभाव अज्ञान जन्मास आला ॥

विवेकें सदा सस्वरूपीं भरावें ।

जिवा ऊगमीं जन्म नाहीं स्वभावें ॥ १४५ ॥

दिसे लोचनी तें नसे कल्पकोडी ।

अकस्मात आकारलें काळ मोडी ॥

पुढें सर्व जाईल कांही न राहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १४६ ॥

फुटेना तुटेना चळेना ढळेना ।

सदा संचले मीपणें तें कळेना ॥

तया एकरूपासि दूजें न साहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १४७ ॥

निराकार आधार ब्रह्मादिकांचा ।

जया सांगतां शीणली वेदवाचा ॥

विवेकें तदाकार होऊनि राहें ।

मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १४८ ॥

जगीं पाहतां चर्मचक्षीं न लक्षे ।

जगीं पाहतां ज्ञानचक्षीं नरक्षे ॥

जगीं पाहतां पाहणें जात आहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १४९ ॥

नसे पीत ना श्वेत ना श्याम कांहीं ।

नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं ॥

म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे ।

मना संत आनंत शोधूनि पाहें ॥ १५० ॥

खरें शोधितां शोधितां शोधिताहे ।

मना बोधितां बोधितां बोधताहे ॥

परी सर्वही सज्जनाचेनि योगें ।

बरा निश्चयो पाविजे सानुरागें ॥ १५१ ॥

बहूतां परी कूसरी तत्त्वझाडा ।

परी पाहिजे अंतरी तो निवाडा ॥

मना सार साचार तें वेगळें रे ।

समस्तांमधें एक तें आगळें रे ॥ १५२ ॥

नव्हे पिंडज्ञानें नव्हे तत्त्वज्ञानें ।

समाधान कांहीं नव्हे तानमानें ॥

नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें ।

समाधान तें सज्जनाचेनि योगें ॥ १५३ ॥

महावाक्य तत्त्वादिकें पंचिकर्णे ।

खुणे पाविजे संतसंगे विवर्णे ॥

द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो ।

द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो ।

तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो ॥ १५४ ॥

दिसेना जनीं तेंचि शोधूनि पाहें ।

बरें पाहतां गूज तेथेंचि आहे ।

करीं घेउं जातां कदा आडळेना ।

जनीं सर्व कोंदाटलें तें कळेना ॥ १५५ ॥

म्हणे जाणता तो जनीं मूर्ख पाहें ।

अतर्कासि तर्की असा कोण आहे ॥

जनीं मीपणें पाहतां पाहवेना ।

तया लक्षितां वेगळें राहवेना ॥ १५६ ॥

बहू शास्त्र धुंडाळितां वाड आहे ।

जया निश्च्च्यो येक तोही न साहे ॥

मती भांडती शास्त्रबोधें विरोधें ।

गती खुंटती ज्ञानबोधें प्रबोधें ॥ १५७ ॥

श्रुती न्याय मीमांसकें तर्कशास्त्रें ।

स्मृती वेद वेदांतवाक्यें विचित्रें ॥

स्वयें शेष मौनावला स्थीर पाहे ।

मना सर्व जाणीव सांडून राहें ॥ १५८ ॥

जेणें मक्षिका भक्षिली जाणिवेची ।

तया भोजनाची रुची प्राप्त कैंची ॥

अहंभाव ज्या मानसींचा विरेना ।

तया ज्ञान हें अन्न पोटीं जिरेना ॥ १५९ ॥

नको रे मना वाद हा खेदकारी ।

नको रे मना भेद नाना विकारी ॥

नको रे मना शिकऊं पूढिलासी ।

अहंभाव जों राहिला तुजपासीं ॥ १६० ॥

अहंतागुणें सर्वही दु:ख होतें ।

मुखें बोलिलें ज्ञान तें व्यर्थ जातें ॥

सुखी राहतां सर्वही सुख आहे ।

अहंता तुझी तूचि शोधूनि पाहें ॥ १६१ ॥

अहंतागुणें नीति सांडी विवेकी ।

अनीतीबळें श्र्लाघ्यता सर्व लोकीं ॥

परी अंतरी सर्वही साक्ष येते ।

प्रमाणांतरे बुद्धि सांडूनि जाते ॥ १६२ ॥

देहेबुद्धिचा निश्चयो दृढ जाला ।

देहातीत तें हीत सांडीत गेला ॥

देहेबुद्धि ते आत्मबुद्धी करावी ।

सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६३ ॥

मनें कल्पिला वीषयो सोडवावा ।

मनें देव निर्गुण तो वोळखावा ॥

मनें कल्पितां कल्पना ते सरावी ।

सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६४ ॥

देहादीक प्रपंच हा चिंतियेला ।

परी अंतरी लोभ निश्चीत ठेला ॥

हरीचिंतनें मुक्तिकांता वरावी ।

सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६५ ॥

अहंकार विस्तारला या देहाचा ।

स्त्रियापुत्रमित्रादिकें मोह त्यांचा ।

बळें भ्रांति हे जन्मचिंता हरावी ।

सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६६ ॥

बरा निश्चयो शाश्वताचा करावा ।

म्हणे दास संदेह तो वीसरावा ॥

घडीनें घडी सार्थकाची करावी ।

सदा संगती सज्जनाची धरावी ॥ १६७ ॥

करी वृत्ति जो संत तो संत जाणा ।

दुराशागुणें जो नव्हे दैन्यवाणा ॥

उपाधी देहेबुद्धितें वाढवीते ।

परी सज्जना केविं बाधूं शके ते ॥ १६८ ॥

नसे अंत आनंत संता पुसावा ।

अहंकार विस्तार हा नीरसावा ॥

गुणेंवीण निर्गुण तो आठवावा ।

देहेबुद्धिचा आठवू नाठवावा ॥ १६९ ॥

देहेबुद्धि हे ज्ञानबोधें त्यजावी ।

विवेकें तये वस्तुची भेटि घ्यावी ॥

तदाकार हे वृत्ति नाहीं स्वभावें ।

म्हणोनी सदा तेंचि शोधीत जावें ॥ १७० ॥

असे सार साचार तें चोरलेंसे ।

इंही लोचनीं पाहतां दृश्य भासे ॥

निराभास निर्गुण तें आकळेना ।

अहंतागुणें कल्पितांही कळेना ॥ १७१ ॥

स्फुरे वीषयीं कल्पना ते अविद्या ।

स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या ॥

मुळीं कल्पना दो रूपें तेचि जाली ।

विवेकें तरी सस्वरूपीं मिळाली ॥ १७२ ॥

स्वरूपीं उदेला अहंकारराहो ।

तेणें सर्व आच्छादिलें व्योम पाहो ॥

दिशा पाहतां ते निशा वाढताहे ।

विवेकें विचारें विवंचूनि पाहें ॥ १७३ ॥

जया चक्षुनें लक्षितां लक्षवेना ।

भवा भक्षितां रक्षितां रक्षवेना ॥

क्षयातीत तो अक्षयी मोक्ष देतो ।

दयादक्ष तो साक्षिनें पक्ष घेतो ॥ १७४ ॥

विधी निर्मिता लीहितो सर्व भाळी ।

परी लीहिता कोण त्याचे कपाळीं ॥

हरू जाळितो लोक संहारकाळीं ।

परी शेवटीं शंकरा कोण जाळी ॥ १७५ ॥

जनीं द्वादशादित्य हे रुद्र अक्रा ।

असंख्यात संख्या करी कोण शक्रा ॥

जगीं देव धुंडाळितां आढळेना ।

जनीं मुख्य तो कोण कैसा कळेना ॥ १७६ ॥

तुटेना फुटेना कदा देवराणा ।

चळेना ढळेना कदा दैन्यवाणा ॥

कळेना कळेना कदा लोचनासी ।

वसेना दिसेना जगीं मीपणासी ॥ १७७ ॥

जया मानला देव तो पूजिताहे ।

परी देव शोधूनि कोणी न पाहे ॥

जगीं पाहतां देव कोट्यानुकोटी ।

जया मानली भक्ति जे तेचि मोठी ॥ १७८ ॥

तिन्ही लोक जेथूनि निर्माण झाले ।

तया देवरायासि कोणी न बोले ॥

जगीं थोरला देव तो चोरलासे ।

गुरूविण तो सर्वथाही न दीसे ॥ १७९ ॥

गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी ।

बहुसाल मंत्रावळी शक्ती मोठी ॥

मनीं कामना चेटकें धातमाता ।

जनीं व्यर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता ॥ १८० ॥

नव्हे चेटकी चाळकू द्र्व्यभोंदू ।

नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू ॥

नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू ।

जगीं ज्ञानिया तोचि साधू अगाधू ॥ १८१ ॥

नव्हे वाउगी चाहूटी काम पोटीं ।

क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी ॥

मुखीं बोलिल्यासारखें चालताहे ।

मना सद्‍गुरू तोचि शोधुनि पाहें ॥ १८२ ॥

जनीं भक्त ज्ञानी विवेकी विरा़गी ।

कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी ॥

प्रभू दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे ।

तयाचेनि योगें समाधान बाणे ॥ १८३ ॥

नव्हे तेंचि जालें नसे तेंचि आलें ।

कळोण लागलें सज्जनाचेनि बोलें ॥

अनिर्वाच्य तें वाच्य वाचे वदावें ।

मना संत आनंत शोधीत जावें ॥ १८४ ॥

लपावें अती आदरें रामरूपीं ।

भयातीत निश्चीत ये सस्वरूपीं ॥

कदा तो जनीं पाहतांही दिसेना ।

सदा ऎक्य तो भिन्नभावें वसेना ॥ १८५ ॥

सदा सर्वदा राम सन्नीध आहे ।

मना सज्जना सत्य शोधून पाहें ॥

अखंडीत भेटी रघूराजयोगू ।

मना सांडि रे मीपणाचा वियोगू ॥ १८६ ॥

भुतें पिंड ब्रह्मांड हें ऎक्य आहे ।

परी सर्वही सस्वरूपीं न साहे ॥

मना भासलें सर्व कांहीं पहावें ।

परी संग सोंडूनि सूखी रहावे ॥ १८७ ॥

देहेभान हें ज्ञानशस्त्रें खुडावें ।

विदेहीपणें भक्तिमार्गेचि जावें ॥

विरक्तीबळें निंद्य सर्वै त्यजावें ।

परी संग सोंडूनि सूखे रहावें ॥ १८८ ॥

मही निर्मिली देव तो ऒळखावा ।

जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा ॥

तया निर्गुणालागि गूणी पहावें ।

परि संग सोडूनि सूखें रहावें ॥ १८९ ॥

नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता ।

परेहून पर्ता न लिंपे विवर्ता ॥

तया निर्विकल्पासि कल्पीत जावें ।

परी संग सोडूनि सूखें रहावें ॥ १९० ॥

देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना ।

तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना ॥

परब्रह्म तें मीपणें आकळेना ।

मनीं शून्य अज्ञान हें मावळेना ॥ १९१ ॥

मना ना कळे ना ढळे रूप ज्याचें ।

दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें ॥

तया खुण ते हीन दृष्टांत पाहें ।

तेथें संग नि:संग दोनी न साहे ॥ १९२ ॥

नव्हे जाणता नेणता देवराणा ।

न ये वर्णिता वेदशास्त्रां पुराणां ॥

नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा ।

श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥ १९३ ॥

वसे ह्रदयी देव तो कोण कैसा ।

पुसे आदरें साधकू प्रश्न ऎसा ॥

देहे टाकितां देव कोठें रहातो ।

परी मागुता ठाव कोठें पहातो ॥ १९४ ॥

वसे ह्र्दयीं देव तो जाण ऎसा ।

नभाचेपरी व्यापकू जाण तैसा ।

सदा संचला येत ना जात कांही ।

तयावीण कोठें रिता ठाव नाहीं ॥ १९५ ॥

नभीं वावरे जो अणुरेणु कांहीं ।

रिता ठाव या राघवेंवीण नाही ॥

तया पाहतां पाहतां तेचिं जालें ।

तेथें लक्षा आलक्षा सर्वे बुडालें ॥ १९६ ॥

नभासारिखें रूप या राघवाचें ।

मनीं चिंतितां मूळ तुटे भवाचें ॥

तया पाहतां देहबुद्धी उरेना ।

सदा सर्वदा आर्त पोटीं पुरेना ॥ १९७ ॥

नभें व्यापिलें सर्व सृष्टीस आहे ॥

रघूनायका ऊपमा ते न साहे ॥

दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावें ।

तया व्यापदू व्यर्थ कैसे म्हणावें ॥ १९८ ॥

अती जीर्ण विस्तीर्ण तें रूप आहे ।

तेथें तर्कसंपर्क तोही न साहे ॥

अती गूढ तें दृश्य तत्काळ सोपें ।

दुजेवीण जे खूण स्वामीप्रतापें ॥ १९९ ॥

कळे आकळे रूप तें ज्ञान होतां ।

तेथें आटली सर्वसाक्षी-अवस्था ॥

मना उन्मनीं शब्द कुंठीत राहे ।

तो गे तोचि तो राम सर्वत्र पाहें ॥ २०० ॥

कदा ऒळखीमाजि दूजें दिसेना ।

मनीं मानसीं द्वैत कांही वसेना ॥

बहुतां दिसां आपुली भेटी जाली ।

विदेहीपणें सर्व काया निवाली ॥ २०१ ॥

मना गूज रे तूज हें प्राप्त जालें ।

परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥

सदा श्रवणें पाविजे निश्चयासी ।

धरीं सज्जनी संगती धन्य होसी ॥ २०२ ॥

मना सर्वही संग सोंडूनि द्यावा ।

अती आदरें सज्जनाचा धरावा ॥

जयाचेनि संगें महादु:ख भंगे ।

जनीं साधनेंवीण सन्मार्ग लागे ॥ २०३ ॥

मना संग हा सर्व संगांस तोडी ।

मना संग हा मोक्ष तत्काळ जोडी ॥

मना संग हा साधकां शीघ्र सोडी ।

मना संग हा द्वैत नि:शेष मोडी ॥ २०४ ॥

मनाचीं शतें ऎकतां दोष जाती ।

मतीमंद ते साधनायोग्य होती ॥

चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगीं ।

म्हणे दास विश्र्वासतां मुक्ति भोगी ॥ २०५ ॥

॥जय जय रघुवीर समर्थ ॥

करुणाष्टके(करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता. आपल्या दुर्गुणाची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात, ती करुणाष्टके होत. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे. ही करुणाष्टके म्हणताना बाह्यसृष्टि विसरुन जाऊन अर्थाबरोबर मनाने रमावे.अनुदिन अनुतापें तापलों रामराया ।

परमदिनदयाळा नीरसी मोहमाया ॥

अचपळ मन माझें नावरे आवरीता ।

तुजविण शिण होतो धांव रे धांव आता ॥ १ ॥

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला ।

स्वजनजनधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला ॥

रघुपति मति माझी आपुलीशी करावी ।

सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी ॥ २ ॥

विषयजनित सूखें सौख्य होणार नाहीं ।

तुजविण रघुनाथा वोखटें सर्व कांहीं ॥

रघुकुळटिळका रे हीत माझें करावें ।

दुरित दुरि हरावें सस्वरूपीं भरावें ॥ ३ ॥

तनु-मन-धन माझें राघवा रूप तुझें ।

तुजविण मज वाटे सर्व संसार वोझें ॥

प्रचलित न करावी सर्वथा बुद्धि माझी ।

अचल भजनलीला लागली आस तूझी ॥ ४ ॥

चपळपण मनाचें मोडितां मोडवेना ।

सकळ स्वजनमाया तोडितां तोडवेना ॥

घडि घडि विघडे हा निश्चयो अंतरीचा ।

म्हणवुनि करूणा हे बोलतो दीनवाचा ॥ ५ ॥

जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी ।

मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं ॥

तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू ।

षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥ ६ ॥

तुजविण करुणा हे कोण जाणेल माझी ।

शिणत शिणत पोटीं लागली आस तुझी ॥

झडकरि झड घालीं धांव पंचानना रे ।

तुजविण मज नेती जंबुकी वासना रे ॥ ७ ॥

सबळ जनक माझा राम लावण्यकोटी ।

म्हणवुनि मज पोटीं लागली आस मोठी ॥

दिवस गणित बोटीं ठेवूनि प्राण कंठीं ।

अवचट मज भेटी होत घालीन मीठी ॥ ८ ॥

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे ।

पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे ॥

जळधरकण आशा लागली चातकासी ।

हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥ ९ ॥

तुजविण मज तैंसे जाहलें देवराया ।

विलग विषमकाळीं तूटली सर्व माया ॥

सकळजनसखा तूं स्वामि आणीक नाहीं ।

वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांहीं ॥ १० ॥

स्वजनजनधनाचा कोण संतोष आहे ।

रघुपतिविण आतां चित्त कोठें न राहे ॥

जिवलग जिव घेती प्रेत सांडूनि जाती ।

विषय सकळ नेती मागुता जन्म देती ॥ ११ ॥

सकळ जन भवाचे आथिले वैभवाचे ।

जिवलग मग कैंचे चालतें हेंचि साचें ॥

विलग विषमकाळीं सांडिती सर्व माळीं ।

रघुविर सुखदाता सोडवी अंतकाळीं ॥ १२ ॥

सुख सुख म्हणतां हें दु:ख ठाकूनि आलें ।

भजन सकळ गेलें चित्त दुश्र्चीत जाले ॥

भ्रमित मन कळेना हीत तें आकळेना ।

परम कठिण देहीं देहबुद्धि वळेना ॥ १३ ॥

उपरति मज रामीं जाहली पूर्णकामीं ।

सकळभ्रमविरामीं राम विश्रामधामीं ॥

घंडिघडि मन आतां रामरूपीं भरावें ।

रघुकुळटिळका रे आपुलेंसें करावें ॥ १४ ॥

जळचर जळवासी नेणती त्या जळासी ।

निशिदिन तुजपासीं चूकलों गूणरासी ॥

भुमिधर निगमांसी वर्णवेना जयासी ।

सकळभुवनवासी भेट दे रामदासीं ॥ १५ ॥

असंख्यात ते भक्त होऊनि गेले ।

तिंहीं साधनांचे बहु कष्ट केले ॥

नव्हे कार्यकर्ता भुमीभार जालों ।

तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलों ॥ १६ ॥

Translation - भाषांतर

N/A
Details
References : N/A

Created by TransLiteral /Courtsey {Khapre.org} on 2008-09-25T22:50:59.3656430-04:00
|-|-|
Comments | अभिप्राय