श्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ !

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीमत् सच्चिदानंद परमहंस स्वामी तारकानंद सरस्वती म्हणजेच पूर्वाश्रमीचें श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराज यांनीं अनेकांच्या जीवनाचें सोने केले. त्यांतील कांहीं - सुवर्णाचे अलंकार बनविले तर कांहीं सुवर्णाला परिसत्वही दिलें. असें परिसत्व देण्याची जी एक परंपरा पुढें चालूं राहिली तीच कथा आतां परिसावी. आमचे परमेष्ठि गुरु श्रीविश्वनाथ महाराज यांचा जन्म श्रीखंडे कुळांत इ.स. १८४३ मध्यें झाला. बालवयांत पंढरपुरीं राहण्याचा योग आल्यानें तेव्हांपासूनच त्यांना सत्संगति, कीर्तनश्रवण, नामस्मरण याची गोडी लागली. त्या काळाप्रमाणें विवाह अगदीं अल्प वयांत झाला होता. एक पुत्र व पत्नी दिवंगतहि झाली तेव्हां महाराजांचा आयुष्यभानु क्षितिजावरुन थोडा वर आला होता इतकेच ! पण त्याही वयांत `देवानें त्याही वयांत `देवानें आपल्याला परमार्थासाठीं पाशमुक्त केले आहे' असे समजून विश्वनाथमहाराज सद्गुरुंच्या शोधांत राहिले. महद्‍भाग्यानें लौकरच श्रीतिकोटेकर महाराजांची भेट होऊन अनुग्रह लाभला. प्राग्जन्मींची शुद्ध पुण्याची शिदोरी, नि:संग, मनमोकळें जीवन, गुरुवचनीं अढळ श्रद्धा, अनुसंधानाचा अविश्रांत अभ्यास यामुळें दीक्षेनंतर फारच थोडया कालावधींत विश्वनाथमहाराज `सोऽहं सिद्ध' झाले. निर्याणापूर्वीचा सुमारे चाळीस वर्षाचा प्रदीर्घ काळ त्यांनीं आपले एक लाडके शिष्य नारोपंत कुलकर्णी (रुकडीकर) यांचे घरींच एका खोलींत व्यतीत केला. यांनीं आपलें श्रीखंडे हे आडनांवहीं पुढें कोणास सांगितलें नाहीं. श्रीज्ञानेश्वरी व एकनाथी भागवत हे दोनच ग्रंथ प्राय: त्यांचे चित्तनांत असत. गोकुळअष्टमी, प्रौष्ठपदी पौर्णिमा व कार्तिक वद्य त्रयोदशी या तिथीला ग्रंथपठण पूर्ण होईल अशा पद्धतीनें ते वर्षातून तीन वेळां ज्ञानेश्वरीचे सप्ताहवाचन करीत आणि करवीत असत. श्रीखंड हें त्यांचें आवडते पक्वान्न आणि स्वत: महाराज महाप्रसादाचे वेळीं पंक्तींत श्रीखंड वाढीत असत.
सद्‍गुरु तिकोटेमहाराज कोल्हापूरला आले की परत जाण्यापूर्वी कांहीं दिवस त्यांचा मुक्काम रुकडीला विश्वनाथ महाराजांकडे व्हायचा हें ठरुनच गेलें होते. पुढें सद्‍गुरुंचा पुण्यतिथि उत्सवही रुकडीस होत असे. साधारणत: सत्त्वगुणी व देवधर्माची आवड असलेला मनुष्य पाहिला कीं रुकडीकर महाराज आपण होऊन त्याला सांप्रदायिक सोऽहं बोध करीत असत. तो उच्च वर्णाचाच हवा असा त्यांचा आग्रह नसे. महाराजांनीं आपल्या नापितालाही अनुग्रह दिल्याचें ऐकलें आहे. त्यांना गुलाबाच्या फुलांची फार आवड असे. गुलाबाचें अत्तर असलेली एक चांदीची डबी महाराजांजवळ हमेशा असायची. दीक्षा देतांना ही चांदीची डबी उघडून त्या सुगंधमय वातावरणांत ते अनुग्रह देत. पूर्वायुष्यांत महाराजांनीं खूप भ्रमंती केली होती पण रुकडीस स्थिर झाल्यानंतर ते सहसा कोठें गेले नाही नाहींत.. वर्षातून एकदां बिनचूक आळंदीस मात्र जात असत व परतीच्या वाटेवर प्रिय शिष्य बाबामहाराज वैद्य यांचेकडे सवडीप्रमाणें मुक्काम होई. रुकडींतदेखील संध्याकाळीं एकदां थोडा वेळ हिंडून येत. बाकीं गांवांत कोणाकडे जाणें नसे. वर्षांतून सबंध एक महिना अनेक शिष्यमंडळी रुकडीस गुरुमाउलींकडे गोळा होत असत. सर्व काळ सर्व वातावरन परमार्थभरित असे. महाराजांनीं गणेशनाथांव्यतिरिक्त आणखीही कांहीं शिष्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला होता. हल्लीं कोल्हापुरांत असलेले श्री. गोविंद परशराम जाधव ऊर्फ गोविंद महाराज यांचे सद्‍गुरु श्रीरामचंद्र महाराज वडगांवकर हे विश्वनाथमहाराजांचे अनुग्रहीत होते. सदर वडगांवकर महाराजांचे एक शिष्य श्री. रामचंद्र ईश्वरा लोले, यळगुडकर हे हल्लीं ऐंशीच्या घरांतले असून यांचाही शिष्यपरिवार बराच आहे. श्री. वडगांवकरमहाराजांचा व गणेशनाथांचा घनिष्ट स्नेहसंबंध होता व उभयतांही परस्परांच्या भजन सप्ताहांत उपस्थित राहात असत. आपण स्वत: वैद्यमहाराजांची परमोच्च बोधनिमग्न अवस्था पाहिलेली आहे अशी माहिती स्वत: श्री. यळगुडकर महाराजांनीं प्रस्तुत संपादकांना आळंदी येथें सांगितली. ती सांप्रदायिकांना निवेदन करतांना संतोष वाटतो. इ.स. १९१८ च्या फेब्रुवारी महिन्यांत म्हणजे शके १८४० च्या माघ शु.॥तृतीया या दिवशीं दुपारीं बारा वाजतां, वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी थोडया आजारानंतर, अर्धांगवायूच्या झटक्याने श्रीविश्वनाथ महाराज म्हणजे आमचे परमेष्ठी गुरु शांतपणें, देहाची खोळ सांडून स्वरुपीं विलीन झाले. श्रीविश्वनाथमहाराजांचा संक्षिप्त जीवन वृत्तान्त, `स्वामी स्वरुपानंद चरित्रांत' पृष्ठ ३३५, ३३६' येथें दिला आहेच. त्याखेरीज येथें ग्रंथित केलेला आणखी तपशील कोल्हापुर येथील ख्यातनाम ज्योतिषवेत्ते श्री. अण्णासाहेब रुकडीकर यांनीं निवेदन केलेला आहे. यांचे घरींच श्रीमहाराज रुकडीस राहात असत. हल्ली अण्णासाहेब ७० ते ७५ च्या घरांत आहेत. विश्वनाथ महाराजांचे निर्याणसमयीं ते २५/३० वर्षांचे असावेत. त्यांना महाराजांचा सहवास नित्याचाच होता व अण्णासाहेब हे अनुग्रहीत पण आहेत. अण्णासाहेबांचे ज्येष्ठ बंधु श्रीभाऊसाहेब रुकडीकर यांना, आपल्या पश्चात्‍ परंपरा चालविण्याची आज्ञा अगदीं अंतकाळीं महाराजांनीं दिली होती. श्रीभाऊसाहेब हेही ३/४ वर्षापूर्वी दिवंगत झाले. यांचा शिष्यवर्ग मोठा आहे. सिद्धचरित्राचें पुनर्मुद्रण करावे अशी अण्णासाहेबांचीही फार वर्षाची इच्छा होती. ते कार्य आतां होत आहे याबद्दल त्यांनीं वेळोवेळीं आपलें समाधान व्यक्त केलें आहे. श्रीसद्‍गुरुंनीं विश्वनाथ महाराजांसंबंधीं आपले मातुल श्रीतत्वज्ञ कै. केशवराव गोखले यांनीं समक्ष पाहून सांगितलेली हकीकत संपादकास सांगितली ती अशी की विश्वनाथ महाराज शिष्यमंडळींत जशी पोथी सांगत असत तसेच ते पायांत चाळ बांधून, वीणा घेऊन फार प्रेमानें नामघोष, नामसंकीर्तन करीत असत. त्या प्रसंगींचें एक छायाचित्रही पूज्य बाबामहाराजांचे संग्रहीं असें. आमचे परमगुरु श्रीगणेशनाथ महाराज ऊर्फ बाबामहाराज वैद्य यांचा जन्म इ.स. १८५५ मध्यें झाला. नक्की दिनांक, जन्मस्थळ, तसेंच बालपणची हकीकतही प्रकाशांत आलेली नाहीं. बाबामहाराजांच्या व्यावहारिक जीवनक्रमांतील कांहीं तपशील `स्वरुपानंद जीवनचरित्रांत' पू. ३३७ ते ३४० यांत पहावा. आम्ही येथें त्यांची पारमार्थिक योग्यता नमूद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. इ.स. १८८५ पर्यंत म्हणजे वयाच्या तीस वर्षापर्यंत बाबामहाराज अगदीं सर्वसाधारण मनोवृत्तीच्या परमार्थविन्मुख मनुष्याप्रमाणें, शिक्षण, नोकरी, प्रपंच यांत रमून गेलेले असे होते. तिशीच्या सुमारास रुकडी येथें पूल बांधणें, रेल्वे लाईन तयार करणें या कामावर रेल्वे इंजिनियर म्हणून ते रुकडीस आले. हा वेळपर्यंत, मनुष्यजन्माचें सार्थक कशांत आहे ? मानसिक शांतीचा, अखंड प्रसन्नतेचा खरा उपाय कोणता ? शुद्ध परमार्थ कशाला म्हणतात ? गुरु आणि गुरुकृपा म्हणजे काय व गुरुकृपेची जरुरी काय ? इत्यादि विषयांत बाबा महाराज पूर्णपणें अनभिज्ञ होते. चार लग्नें होऊनही संतानसुख नाहीं अशा खिन्नतेचा त्यांचे मनावर त्यावेळीं पगडा होता. रुकडींत मुक्कामाला असल्यानें कामावरुन परतल्यावर, उरलेला वेळ कोठेतरी घालवायचा अशा साध्या हिशोबानें, व अनेक लोक नारोपंत रुकडीकरांच्या घरांत असलेल्या एका व्यक्तीकडे बरीच जा-ये करतात तेव्हां त्या व्यक्तीजवळ चार-चौघांपेक्षां कांहीं विशेष असले पाहिजे; आपल्या प्रपंचांतील न्यून या साधूकडून पुरे झाल्यास पाहूं तर खरे - अशा प्रापंचिक मंडळींच्या मतलबी वृत्तीनें बाबा महाराज प्रथम विश्वनाथमहाराजांकडे जा ये करुं लागले. आणि काय आश्चर्य ! `पूर्वाभ्यासेन तेनैव ह्नियते ह्यवशोऽपि स:, असें कांहींसे होऊन, प्राग्जन्मींच्या शुभसंस्कारांनीं, परमार्थसाधनेच्या संस्कारबळामुळें बाबा महाराजांचें अंत:करण सद्‍गुरुप्रेमानें व्यापून टाकलें. शेणाच्या पोहाजवळ अग्नि नेला तर अग्निच विझतो. लाकडाला लावला तरी खूप फुंग मारावे लागतात पण तोच अग्नि शुद्ध कर्पूरखंडाला लावताच तो कापूर अंतर्बाह्य अग्निरुप होतो. बाबांचें अंत:करण असें शुद्ध कापराच्या जातीचें असल्यानें खरी सत्संगति घडण्याचाच काय तो अवकाश होतो. श्रीविश्वनाथ महाराजांच्या सहवासांत आल्यानंतर औपचारिक अनुग्रह विधीसाठीं पांच वर्षांचा कालावधि गेला असला तरी खरें म्हणजे वर्ष सहा महिन्यांतच, `चोखट प्रति भिंतीवर उमटलेल्या, मूळ चित्राच्या तंतोतंत प्रतिबिंबाप्रमाणें, श्रीविश्वनाथ महाराजांचा बाह्य पारमार्थिक जीवनक्रम आणि त्यांची आंतरिक आत्मबोधप्रसन्नता हे जसेच्या तसे बाबांच्या व्यवहारांतून दिसून येऊं लागले होते. परमगुरुंची इ.स. १८९० ते १९१२ या काळांत `तपश्चर्या' झाली. देहानें ते नोकरीनिमित्त अनेक ठिकाणीं जात असत पण `बैसका न मोडे मानसींची' ही स्थिरता, गुरुकृपेनें झालेल्या प्रदीर्घ अभ्यासानें, बाबांना प्राप्त झाली आणि गुरुदेव रानडे यांचे शब्दांत सांगायचे म्हणजे `बाबा-महाराज' नोकरींत `कायम झाले !' इ.स. १९१८ मध्यें सद्‍गुरु विश्वनाथ महाराज समाधिस्थ झाले. दरम्यान लौकिक सद्‍गुरुसानिध्यांत राहात असत. परस्परांचें प्रेम अभूतपूर्व होते. बाबांचें अंत:करण जात्या अत्यंत कोवळें होते, भावयुक्त होते आणि त्यामुळेंच, सद्‍गुरुपदारुढ झाल्यावर त्यांना फार तर्ककुतर्क करणार्‍या व्यक्तीवर कृपा करणें हें सहजासहजीं शक्य होत नसे. सद्‍गुरुंचा निरोप घेतांना बाबांच्या नेत्रांतून श्रीचरणावर प्रेमाश्रूंचा अभिषेक व्हायचा. बाबा महाराजांचें एक वैशिषट्य म्हणजे रुकडीकर महाराजांच्या संगतीस आल्यानंतर त्यांनीं एकच ग्रंथ हातीं धरला आणि अखेरपर्यंत फक्त ज्ञानेश्वरीचेंच वाचन मनन केलें ! स्नान झाल्यावर हस्तलिखित पोथी वाचीत आणि इतर वेळीं कुंटे यांची ज्ञानेश्वरी हातीं असे. अन्य सटरफटर वाड्मय तर नाहींच पण अध्यात्मशास्त्र मातेच्या जिव्हाळ्यानें समजावून सांगणारे आणखी प्रासादिक संतग्रंथही बाबांनीं उघडून पाहिले; नाहींत यावरुन त्यांची ज्ञानेश्वरीसंबंधीची निष्ठा काय जातीची व दर्जाची असेल याची करवेल तेवढी कल्पना करणें वाचकांवरच सोपवितो. परमगुरुंनीं ज्ञानेश्वरीवर गांवोगांव जाहीर प्रवचनें केलीं नाहींत. त्यांच्या वक्तृत्वांत संस्कृत प्राकृत ग्रंथांतील प्रमाणांचा मुसळधार पाऊस नसे आणि न्यायघटित भाषेच्या बिकट अरण्यांतही ते श्रोत्यांना नेऊन सोडीत नसत. हृदयाला भिडणारे, भावगर्भ साधे शब्द, ज्ञानेश्वरींतलेच व्यावहारिक दृष्टान्त, सद्‍गुरुकृपेचें अधिष्ठान, सोऽहं बोधाच्या अविश्रांत अभ्यासाचा मधुर परिपाक, आत्मसाक्षात्काराची सर्व इंद्रियांतून व वाणींतून प्रकट होणारी, अखंड प्रसन्नता - अशा लक्षणांनीं मंडित असें त्या महापुरुषाचें ज्ञानेश्वरी निरुपण ज्या अल्पशा महाभाग्यवंतांना श्रवण करावयास मिळालें ते त्रिवार धन्य होत ! बाबामहाराजांनीं निवडक लोकांना सोऽहं अद्वय राजयोगाची संप्रदायदीक्षा दिली. सत्पात्र याचकासाठीं खजिना खुला करावा; पण दात्याजवळ कितपत द्रव्य आहे याची वांझोटी चाचपणी करुं पाहणार्‍या व्यक्तीपुढें हेतुपूर्वक कंजूषपणाचीच वर्तणूक करावी - अशा स्वभावाच्या एकाद्या दानशूर कोट्याधीशाची कल्पना जर करतां येईल तर बाबामहाराजांच्या अनुग्रह दीक्षेचें स्वरुप चटकन्‍ ध्यानीं येईल. यामुळेंच बाबा महाराज हे एक साक्षात्कारी सिद्धपुरुष आहेत अशी ओळख त्यांच्या हयातींत फारच थोडया मंडळींना पटली होती. वयाच्या ७८ व्या वर्षी, केवळ वृद्धापकाळाच्या निमित्तानें पौष शु.॥११ शके १८५५ या तिथीस `झाकलिया घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां ।' या रीतीनें जगाच्या नकळत परमगुरुंनीं देह ठेवला. वीस वर्षांचा एक युवक १९२३ सालीं बाबा महाराजांच्या दर्शनाला आला आणि त्यांच्या पूर्ण पसंतीस तो उतरल्यानें वयाच्या अडुसष्टाव्या वर्षी, स्वत:पेक्षां अठ्ठेचाळीस वर्षांनीं लहान असणार्‍या या युवकास परंपरेच्या सोहंबोधामृताचा बाबांनीं पूर्णाभिषेक करुन `आपल्या पदीं बैसविले' होते. हेच स्वरुपनाथ ! आमचे सद्‍गुरु स्वामी स्वरुपानंद !  श्रीमत्‍ सच्चिदानंद सद्‍गुरु श्रीस्वरुपानंद स्वामीजींसंबंधीं कांहीं लिहावयाचे मनांत येतांच श्रीज्ञानेश्वरमहाराजांची दोन वचनें डोळ्यापुढे उभी राहतात. `बोलींअरुपाचें रुप दावीन' असा ज्यांचा आपल्या अमोघ वाचाशक्तीवर पूर्ण विश्वास; `अतिन्द्रिय परि भोगवीन । इंन्द्रियाकरवी ॥' हे ज्यांच्या वाक‍सामर्थ्यानें अनेकांनीं अनुभविलेंही; असे कविकुलगुरु, खरे खरे भाषाप्रभु श्रीज्ञानदेवमहाराज हे सद्गुरु वर्णनीं प्रवृत्त झाले म्हणजे मात्र तें करणें `मोतिया भिंग देणें' यांसारखें होते अशा जाणिवेनें `स्तुति सांडूनि निवांता । चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥'  ही गोद मुग्धता स्वीकारतात; असें असतां आमच्यासारख्या सामान्य लोकांनीं स्वरुपानंद सद्‍गुरुसारख्यांबद्दल कांहीं लिहिणें हें लखलखीत मोत्याची कांति पाहण्यासाठीं भिंग पुढे करण्यासारखेंच होय. तरीदेखील प्राप्त कर्तव्य म्हणून सद्‍गुरुविषयीं चार ओळी पुढें लिहीत आहोंत. श्रीभक्त डाँ. रा. य. परांजपे यांनीं लिहिलेल्या सविस्तर चरित्रांत श्रीस्वामींसंबंधीं घटनात्मक सर्व तपशील मिळेल; तसेंच तत्त्वविवेचनही फार उत्कृष्ट आहे. येथें शक्यतों संक्षेपानें श्रीसद्‍गुरुंच्या पारमार्थिक जीवनक्रमाचा विचार कर्तव्य आहे. श्रीस्वामींना वयाच्या विसाव्या वर्षी गुरुकृपा झाली. तत्पूर्वी त्यांनीं श्रीज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, दासबोध इ. संतग्रंथांचा तसेंच उपनिषद्‍ वाड्मयाचा चांगला अभ्यास केला होता. सद्‍गुरुकृपेशिवाय खरी कृतार्थता नाहीं हें त्या चिंतनांतूनच श्रीस्वामींना जाणवले होते. तें गुरुकृपेसाठीं उत्कंठित होते. स्वामी विवेकानंद, स्वामी रामतीर्थ यांचेप्रमाणेंच स्वामींच्या ठिकाणीं उत्कृष्ट बुद्धिमत्ता व उत्कट सात्त्विक श्रद्धा यांचा जन्मत:च मनोहर संगम झाल्यामुळें, सद्‍गुरु बाबा महाराज वैद्य हे साक्षात्कारी पुरुष आहेत अशी प्रथमदर्शनीं खात्री पटतांच, पूर्ण श्रद्धेनें स्वामीजी त्यांना शरण गेले. गुरुपादिष्ट सोऽहं जप हाच आपला उद्धाराचा, परम शांतीचा, अखंड प्रसन्नतेचा एकमेव मार्ग अशी स्वामींची शंभर टक्के श्रद्धा जडली. या बाबतींत कधीं शंका उद्‍भवलीच नाहीं. त्यामुळें बाबा महाराजांना या शिष्योत्तमाची वारंवार तयारी करुन घेण्याची दगदग पडली नाहीं. इ.स. १९२३ ते १९३४ म्हणजे अनुग्रह झाल्यापासून, सहा महिन्यांचा गंभीर आजार होईपर्यंत, अकरा वर्षांच्या दीर्घ काळांत, अक्षरश: अनंत व्यापांत निमग्न असतांना श्रीस्वामींनीं सोऽहं जपाचे अनुसंधान टिकविण्यासाठीं जे आटोकाट प्रयत्न केले; सदैव उल्लसित वृत्तीनें जो गुरुबोधचिंतनाचा अविश्रांत अभ्यास केला हेंच आमच्या सद्‍गुरुंचें खरें चरित्र होय. साधकांच्या सर्वकाळ उपयोगाचा असा हा त्यांच्या जीवनांतील गाभा आहे. शरीर निरोगी असतांना, सर्व इंद्रियशक्ति जोमांत असतांनादेखील आळस, निद्रा, कुतर्क, श्रद्धेंत व्यभिचार, दृढनिश्चयाचा अभाव, अनिष्ट संगति, अशा अनेक कारणांनीं, कितीतरी माणसें श्रीगुरुंचा उपदेश होऊन वर्षे गेली तरीही साधनेच्या प्रांतांत पदार्पणच करीत नाहींत. साधकावस्थेंतील वाटचालहि नाहीं तर सिद्धावस्थेच्या मुक्कामाची गोष्टच कशाला ?
आमच्या सद्‍गुरुंची थोरवी काय वर्णन करावी? कीं सहा महिने शरीर अंथरुणाला खिळले असतां, देहाची सर्व शक्ति नाहींशी झाली असतां, संपूर्ण पराधीन जिणें प्राप्त झाले असतां, श्रीसद्‍गुरुंनीं अकरा वर्षाच्या अभ्यासाची शिदोरी घेउन याच सहा महिन्यांत सोऽहं सिद्धीचें गौरीशंकर शिखर गांठलें ! ! १९३५ ते आज १९७० या पस्तीस वर्षांच्या काळांत, म्हणजे जवळ जवळ तीन तपांच्या मुदतींत श्रीसद्‍गुरुंची प्रकृति धडधाकट अशी कधींच झाली नाहीं. पण त्यांचे ठिकाणीं बहरलेली नित्य प्रसन्नता, परमशांतीचा अखंड तेवणारा नंदादीप, आत्मशक्तीचा सदोदित हेलावणारा महासागर, या गोष्टी पाहिल्या, अनुभविल्या म्हणजे सद्‍गुरुंचें जीवन हाच एक महान्‍ चमत्कार आहे. याची तात्काळ प्रचीति येते. श्रीस्वामींचे एक निकटवर्ती शिष्य, गीतेचे व्यासंगी, एकदां उद्‍गारले ``भगवद्‍गीतेतील दुसर्‍या अध्यायांतील स्थितप्रज्ञ लक्षणें, बाराव्यांतील भक्तलक्षणें, तेराव्यांतील ज्ञानलक्षणें, चौदाव्यांतील गुणातीत लक्षणें, सोळाव्या अध्यायांतील दैवी संपत्‍ लक्षणें, आणि अठराव्यांतील `ब्रह्मभुयाय कल्पते' नव्हे तर ब्रह्मभूत प्रसन्नात्मा कसा असतो ही लक्षणें - असे सर्व `मापक' वापरुन मी कितीतरी वेळां श्रीस्वामींच्या वागणुकीचें निरीक्षण केले आहे. काय सांगूं ? एखादी चूक निघाली तर मूळ श्लोकांतील पदांतूनच निघेल ! '' भावविवश होणें हा ज्यांचा पिंडच नाहीं अशा व्यक्तीनें काढलेल्या या उद्‍गारांना फार मोठा अर्थ आहे. यापेक्षां श्रीसद्‍गुरुसंबंधीं आम्ही कांहींही लिहिण्यास असमर्थ आहोत.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP