TransLiteral Foundation

श्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व
श्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व या विषयावर एक पुस्तिका सहज तयार होईल इतकीं अनेक सुंदर स्थळें या पोथींत आहेत. आमच्या मूळ अंदाजापेक्षां प्रस्तावनेचा व्याप बराच वाढल्यानें, पोथीकर्त्यांच्या काव्यगुणांचा विस्तृत परिचय करुन देण्याची ऊर्मि शमवावी लागत आहे. तरीदेखील हा पैल इतका सतेज व मनोहर आहे कीं त्याचें ओझरतें दर्शन वाचकांस करुन दिल्याखेरीज राहावत नाहीं. अध्यात्मशास्त्राचें सिद्धान्त मराठींत काव्यमय शब्दांतून स्पष्ट करण्याचा पाया श्रीज्ञानदेवांनीं रचला. पोथीकर्ते त्याच परंपरेंतील आहेत. या पोथींत सांप्रदायिक सोऽहं अद्वय राजयोग, आणि सिद्धपुरुषांची लीलाचरित्रें ह्या गंगायमुना संगमांत रसिकतेची सरस्वती प्रकटपणें वाहात आहे. अशा ह्या अनुपमेय त्रिवेणी संगमांत अवगाहन करुं. यथेच्छ पोहणें-पुढें कधीतरी ! सर्वप्रथम नजरेंत भरतो तो पोथीकर्त्यांचा बहुश्रुतपणा. उपनिषदें, भाष्यें, पंचदशी, भगवद्‍गीता, श्रीमत्‍ भागवत, स्मृतिग्रंथ, इतर पुराणें, षद्‍दर्शनें, महाभारत, महिम्नासारखीं स्तोत्रे-इत्यादि संस्कृत वाड्मय आणि मराठी भाषेंतील ज्ञानेश्वरी, नाथभागवत, दासबोध, तुकोबांचे अभंग, महीपति-श्रीधरांचेम ओवीबद्ध ग्रंथ, वामन पंडित, मोरोपंत यांची काव्यरचना या वाड्मयमहोदधींत पोथीकर्ते लीलया संचार करतात याचे अनेक पुरावे मिळतात. कांहीं पाहूं.
(१) `द्वा सुपर्णा ....इत्यादि मुंडकश्रुति, प्रज्ञानं ब्रह्म, सर्वं खल्विंदं ब्रह्म इ. चार महावाक्यें, ब्रह्मविद‍ ब्रह्मैव भवति । आयुरन्नं प्रयच्छति ।' प्रारब्धकर्मणां भोगादेव क्षय: । या पंक्तीचा `प्रारब्धाचा क्षय । भोगावाचूनि न होय ।' हा समर्पक अनुवाद तसेंच तनुचतुष्टय विचार, प्रकृति-पुरुष, नित्यानित्य विवेचन, देहत्रयनिरसन, विश्व, तैजस प्राज्ञ हे निर्देश, जहल्लक्षण, अजहल्लक्षण, जहदजहल्लक्षण, सृष्टीच्या उत्पत्तीची प्रक्रिया सांगणार्‍या ओव्या, दृश्य, दर्शन द्रष्टा ही त्रिपुटी, शबल वाच्यांश, तन्मात्रापंचक, घटद्रष्टा घटाद्‍ भिन्न: । याचा `घटाद्‍ष्टा घटाहून । भिन्न; ऐसें वेदान्तवचन ।' हा अनुवाद, `जें प्रत्यक्ष केवळ । तेचि मानिति बरळ । येर म्हणती टवाळ । अर्थजात ॥' हें पाखंड मतांचे वर्णन, जीवाचा अविद्योपाधि, शिवाचा मायोपाधि, `अहं देही अहंजीव । अहं ममतेचाचि गौरव । अहमात्मा हा पुसोनि ठाव । विचरे अभिनव अवकळा ॥' या ओवींतून वेदान्तशास्त्रांत वर्णिलेल्या भ्रमाचें, अविद्याशक्तीचे कार्याचे अनुवादात्मक स्वरुप - अध्याय चाळीसमध्यें १८० ते १८५ या ओव्यांतून, मीमांसा, न्याय, सांख्य, व्याकरण, पातंजलयोग, वेदान्त या सर्वांचा अर्ध्या किंवा एका ओवींत केलेला मार्मिक उल्लेख अशा कितीतरी ठिकाणीं श्रीपति, कृष्णसुत व गोदामाई कीर्तने यांच्या सच्छास्त्रश्रवणाच्या खुणा दिसतात.
(२) श्रीमद्‍ भगवदगीतेंतील अनेक श्लोकांचा ओवीरुप अनुवाद केलेला आढळतो. बहुतेक प्रत्येक ठिकाणीं, `गीतेंत सांगितलें आहे' अशा अर्थाचा हवाला दिला आहे हेंही उल्लेखनीय वाटते. कांहीं ओव्या पहा. धर्मग्लानि होऊं पाहे । तेव्हां अवश्य मज येणें आहे ।, जे शुद्धसत्त्वें आथिले । तेचि ऊर्ध्वपंथें गेले । ऐसें गीतेमाजीं वहिले । श्रीकृष्ण वदले अर्जुनासी ॥,
योगभ्रष्ट जन्मांसी येतां । पौर्वदेहिक बुद्धि तत्त्वता । प्रकटोनि लावितसे सत्पथा । ऐसें गीता सांगतसे ॥, कलीमाजी धर्मग्लानि । होतां, अवतरेन जनीं ।, ही दैवी गुणमया । मम माया दुरत्यया । मजचि शरण आलिया । तरती माया ते एक ॥ ऐसें गीतेमाजीं देवा । उर्ध्वबाहू करोनि सर्वा । सांगसी .....
(३) श्रीमत्‍ भागवतमहापुराणाचा व्यासंग पुढील उदाहरणांतून दिसून येईल. पौराणिक ऋषी, राजे, हरिभक्त इत्यादींची जीं अनेक नांवें प्रसंगोपात्त पोथींत आढळतात त्यापैकीं सगराचे पितर, उत्तरेच्या संदर्भात अश्वत्थामा, कच, बृहस्पति, अजामीळ, पृथुराजा, बलि, प्रह्लाद, गजेन्द्र, परीक्षिति, प्रभूचा हंस अवतार, जडभरत हे सर्वजण आपणांस श्रीमद्‍भागवतांत दर्शन देतात. पूजा या अर्थी `सपर्या' हा शब्द भागवतांत नेहमीं येतो. सिद्धचरित्रांत अ २०/ओ ५८ मध्यें सपर्या हा शब्द त्याच अर्थी योजला आहे. आदिनारायण, ब्रह्मदेव, नारद, व्यास, शुकाचार्य परीक्षिति ही भागवतांतील गुरुशिष्यपरंपरा अध्याय चाळीसमध्यें श्रीपतींनीं जशीच्या तशी दिली आहे. `शाब्दे पर च निष्णात । तयापासीच भागवत - । धर्म शिकावे, हें एकादशांत । तृतीयांत सांगितले ॥'३८॥
या १७ व्या अध्यायांतील ओवींत तर `तस्मात्‍ गुरुं प्रपद्येत इत्यादि मूळ श्लोकांतील `शाब्दे परे च निष्णातं' ही गुरुंचीं विशेषणें, लक्षणें उधृत केली आहेत. मूळ श्लोक कोठें आहे त्याचाही निर्देश दिसतो. `अद्य वाब्दशतान्ते मरणा । प्राप्त जाणा होणें असे ॥' या ओवींत `अद्य वाब्द शतान्ते वा मरणं प्राणिनां ध्रुवम्‍ ॥' ह्या श्लोकार्धाचा स्पष्ट ठसा आहे.
(४) आणखी कांहीं पौराणिक व्यक्तींचे उल्लेख - जनक राजा, सनकादि ब्रह्मकुमार, नळराजा, हरिश्चंद्र, पांडव, श्रीरामचंद्र, उपमन्यु, अगस्ति, कैकेयी-मंथरा, भीष्मद्रोण, दुर्वास, एकलव्य, शिबी राजा, दत्त, वामदेव, याज्ञवल्क्य, श्रियाळ, अज, सांदीपनी, उत्तरा अभिमन्यु, मारुति तसेंच श्रीसमर्थ, एकनाथ, जनार्दनस्वामी, वेणाबाई, महीपति, तुकोबा, वामनपंडित.
(५) ह्या जंत्रींतील अनेकांच्या चरित्राचा उपयोग कवीनें वर्ण्य विषयाला पौराणिक दाखला म्हणून केला आहे आणि ते दृष्टान्त इतके सहज ओघांत आले आहेत कीं त्यावरुन ओवीकर्त्यांचा एतद्‍ विषयक व्यासंग किती उत्कट भक्तिप्रेमाचा असेल, स्मरणशक्ति किती तीव्र असेल याची चटकन्‍ जाणीव होते. कांहीं उदाहरणें :
(अ) अ. ७ मध्यें, गोरक्षनाथांनीं एक डोळा वडयासाठीं बाईस काढून दिला. भिक्षा घेऊन परतल्यावर सद्‍गुरु मत्स्येन्द्रनाथांनीं दुसराही डोळा काढून मागितला, तो त्वरित पुढें ठेवून गोरक्ष आनंदित झाला असा कथाप्रसंग आहे. येथें श्रीपतींनीं दृष्टान्तासाठीं एक हृद्य ओवी घातली आहे : एकलव्यें अंगुष्ठास । कीं शिबीनें दिधलें स्वमांसास । तैसेंच गोरक्षें निजनेत्रास । अति उल्हासें दीधलें ॥६१॥
(ब) अ ९ मध्यें : मृत स्त्रीसाठीं राजा (भर्तृहरी) मोहवश होऊन शोक करीत आहे हें पाहून, गोरक्षनाथांना बडी बडी मंडळी मोहग्रस्त होतात याचें स्मरण होते आणि त्यांचे मुखानें श्रीपतिनाथ भागवतांतील समर्पक दृष्टान्त देतात. ते म्हणतात " अहो मोहाची अगाध कीर्ति । ज्ञानियासीही पाडिले भ्रांतीं । जन्म हरिण योनीप्रती । `भरता' लागीं पशुमोहे ॥८६॥
(क) अ २० मध्यें श्रीगुंडामहाराजांनीं धर्मपत्नीची सेवावृत्ति कसोटीस लावण्यासाठीं स्वत:च्या सर्वांगावर गलत्कुष्ठ उत्पन्न केले. तरीही महाराजांच्या पत्नीनें न कंटाळतां सेवा केली हें सांगतांना चट्‍कन्‍ कवीला श्रियाळ राजाचें स्मरण होते. ते लिहितात. `परि नवल ते सुंदरी । अनन्यभावें सेवा करी । जैसा सांब वेषधारी । श्रियाळें स्वकरें सेविला ॥२०५॥
या संदर्भात आणखी एकच उदाहरण नमूद करतो.
(ड) अ ३६ मध्यें पू. गोदामाईंना सद्‍गुरुकृपेची तीव्र तळमळ लागली आणि त्या संधीस नेमके तिकोटेकर महाराज करवीरला आले होते. हें कसें म्हणाल तर `गजेन्द्राचिये हांके । धांव घेतली वैकुंठनायके ।' ......
तैसाचि श्रीरामचंद्र । दीनोद्धार दया करी ॥''
पौराणिक दाखले देण्याची अशी हृदयंगम उदाहरणें आणखीही आहेत.  
(६) धर्मशास्त्र, स्मृतिग्रंथ यांचाही कवींना चांगला परिचय होता. पुरुषा बाधती स्त्रियेचे दोष । अथवा परान्नें पुण्यनाश । ऐसी भाष शास्त्राची ॥ पडो नेदी पुन्नाम नरकांत । म्हणवोनि म्हणिजे त्या नांव पूत । स्त्रियांनीं जावे सहगमन । ऐसें धर्मशास्त्रीं असे विधान । `न मातु: परदैवतम्‍' `अपुत्रस्य गतिर्नास्ति ।' यासारख्या उल्लेखांतून हें दिसून येईल.
(७) सप्तसमुद्र मषीपात्र । ऊर्वीपत्र न पुरेचि ॥ या ओवीचरणावर महिम्नांतील `असित्‍ गिरिसमं स्यात्‍ इ. श्लोकांतील कज्जलं सिंधुपात्रे व लेखनीपत्रमुर्वी या पदांची छाप आहे.
(८) कांहीं संस्कृत सुभाषितांचेही अर्थगर्भ ओवी करण पोथींत आढळते. पहा : समानशीले व्यसनेषु सख्यं - समानशील कीं ते व्यसन । तयासी मैत्री घडे पूर्ण । परोपकाराय फलन्ति वृक्षा: । - परार्थ फळती झाडें ।
परोपकाराय वहन्ति नद्य: । नदी परार्थ वाहे कोंडें । राजद्वारीं आणि स्मशानीं । उत्सवी आणि व्यसनीं (म्ह.संकटांत) तैसेचि राष्ट्रप्लवनीं । जो सन्निधानी तोचि बंधु ॥ ही सबंध ओवी हेंही मूळ संस्कृत श्लोकाचे प्राकृतीकरण आहे.
(९) एक म्हणती गवाळे । एक म्हणती सोवळे । एक म्हणती सांडिले । वस्त्र माझें ॥
तसेंच : जन्म दु:खाचा सागर । जन्म विपत्तीचें भांडार । जन्ममृत्याएवढे घोर । आणिक दुस्तर असेना ॥ --
या ओव्यांतील `एक म्हणती' व `जन्म' याची पुनरावृत्ति दासबोधांतील ओव्यांची आठवण करुन देते.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2020-03-12T19:56:29.1270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

procure marraige

  • विवाह घडवून आणणे 
RANDOM WORD

Did you know?

आत्मतत्व ही काय संकल्पना आहे?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.