श्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


ओवीकर्त्याना मनुष्यस्वभावाची उत्तम पारख आहे. हें त्यांनीं निरनिराळ्या प्रसंगीं केलेल्या वर्णनांतून स्वच्छ दिसून येते. कांहीं उदाहरणें देतो. विस्तारभयास्तव त्रोटक उल्लेख व अध्याय-ओव्यांचा निर्देश करीत आहों ते कथाभाग मुळांतून या दृष्टीनें वाचनीय आहेत, उद्‍बोधक आहेत :
(१) मच्छेंद्रांनीं दिलेले भस्म विश्वासानें भक्षण न करतां बाई मैत्रिणीकडे गेली. तिनें मनांत विकल्प निर्माण केला. अ. सहा मधील ओव्या १८ ते २३ पाहाव्यात. स्त्रीस्वभावाचे दोन नमुने हुबेहुब पाहावयास मिळतात.
(२) आदल्या दिवशी वडयाची, मिष्टान्नाची भिक्षा मिळाल्यानंतर गोरक्षनाथ गुर्वाज्ञेनें पुन: त्या घरी दुसरें दिवशी त्याच हेतूनें गेले त्यावेळी त्या बाईनें काढलेले उद्‍गार अ. ७-४४ ओवींत मार्मिकपणें घातले आहेत.  
(३) स्त्रियांनीं गुरु करणें हे अजूनही समाजाला कानडें वाटते. श्रीपतींचे काळीं व त्यांनीं वर्णिलेल्या कथाप्रसंगाचे काळांत ही समजूत खूपच दृढ होती. त्यांतून गोपीचंदाची आई मैनावती म्हणजे राजघराण्यांतील स्त्री ! तिनें जालंदरनाथांस गुरु केले. कवि म्हणतात : राजस्त्री दरिद्र्याची सेवा करीत । हें अनुचित जन म्हणती ॥
राजाच्या जनानखान्यांतही कवीला प्रवेश मिळालेला दिसतो. त्या स्त्रिया `राया आपुली जननी । हीनाची सेवनीं रत झाली ।' अशी चहाडी चुगली करतात आणि `हें न माने आमुचे मना ।' असा अभिप्रायही झोकून देतात ! अ. १२/३०.
(४) अ १३ मध्यें असा प्रसंग आहे कीं स्त्रीराज्यांतून मच्छिंद्रनाथांना घेऊन जाण्यासाठीं शेवटीं धर्मनाथाचें गुदक्षालन करण्याचें निमित्त मिळालें. दगडावर आपटून त्याला गोरक्षांनीं धुतलें. पद्मिनीचा आकांत पाहून `मच्छिद्रांना घेऊन जाण्याची परवानगी देत असशील तर पुत्र आतां सजीव होईल' असे गोरक्ष स्पष्ट म्हणत असतां देखील तिच्या तोंडून `मुलगा एवीतेवी गेलाच आहे. मी आनंदानें मत्स्येन्द्रनाथांना नेण्याची परवानगी देते' असे उद्‍गार न येतां, मनुष्यस्वभावाप्रमाणें, या सिद्ध पुरुषांचा प्रभाव विसरुन तिनें पुत्र उठविण्याचाच, आग्रह धरला. कवि म्हणतात :
....... `मच्छेन्द्रा निरोप देसी सत्य । तरीच हा पुत्र उठेल ॥४८॥
ऐसें सांगितलें जरी । तरी प्रभाव न जाणेचि नारी । मोहें झळंबली अंतरीं । म्हणे धर्मनाथा दाखवी ॥४९॥
तुम्ही सुखें करा गमन । माझा पुत्र द्या मजलागून .......'
ज्यांनीं पुत्राला अमानुष रीतीनें मारले तेच सिद्ध पुरुष त्याला जिवंत करायलाही समर्थ आहेत याचे जर पद्मिनीला स्मरण राहिले असते तर मच्छेन्द्रांना घेऊन जाण्यास तिनें होकार दिला नसता ! गोरक्षांचा निरुपाय झाला असता; पण अखेर इतका सिद्ध सहवास होऊनही तिची देहबुद्धि व पुत्रवात्सल्य हेंच प्रबळ ठरले ! गोरख म्हणे पद्मिनीसी । आतां निरोप द्यावा आम्हासी । पूर्वीच गुंतविली वचनासी । ........ हे ओवीचरण मार्मिक आहेत.
(५) दु:खांत किंवा संकटकाळीं मनुष्य अनेक देवदेवतांचा धावा करतो, नवस करतो. १४ व्या अध्यायांत नंदराम नांवाच्या तरुणाचा मृत्यु झाल्यावर त्याची आई जो शोक करते त्या प्रसंगांतून हा मानवी स्वभाव सुंदर व्यक्तविला आहे.
`धाव धाव गे अंबाबाई । खंडेराया म्हाळसाबाई ।
तुमची ओटी भरीन लवलाही । .......॥३२॥
पंढरिराया करीन वारी । अनवाणी पादुका घेऊन शिरीं ।
माझें संकट तूं निवारी । उठवा सत्वरी मम पुत्र ॥३३॥
आणखी ३/४ ठिकाणचा अध्याय, ओव्यांच्या नुसता संदर्भ देतो.
(६) नाशिवंत संसारसुखांत जीव रमतो. खरें पारमार्थिक सुख त्याला मनापासून नको असते. अध्याय १५ ओव्या १२ ते १८ पहा.
(७) दानधर्म करणार्‍या साधुजवळ लोक कोणत्या हेतूनें गोळा होतात त्याचें यथातथ्य चित्रण अ १९ मध्यें ११२ ते ११५ ओव्यांतून आहे.
(८) दांभिक भक्त खर्‍या साधूच्या कीर्तीनें मत्सरग्रस्त होऊन अभिचार कर्मे करायला देखील उद्युक्त होतात. अ २० मधील ओव्या १०४ ते १०९ पाहाव्यात.
(९) साधु कसा असावा तर प्रपंचाला मदत करणारा, देहदु:खे दूर करणारा - ही सार्वत्रिक समजूत कवींनीं २२ व्या अध्यायांत ११७ ते १२० ओव्यांतूनच वर्णिली आहे. वाचीत असतां हंसु फुटेल अशा कांहीं ओव्या नमूद करतो. `सव्वा हात मिति प्रमाण । रुद्राक्षमाळा हातीं घेऊन । महंत करिती जपानुष्ठान । मौनमुद्रा धरोनियां ॥३७॥
अ १५ एक म्हणती प्रसंग कठिण । बाईल जाहली बाळंतीण । तयामाजी बहुत ऋण । होती प्राण व्याकुळ ॥११४॥
अ १९ हातघालावा विष्ठेमधीं । मग करावा क्षालनविधि । इतुकी उपाधि कासया ? ॥१९२॥ १९
जेथ घालावे तिखट । तेथ घाली पीठ । शर्करास्थानीं मीठ । क्षिरी माजीं ॥९६॥ २२
गुरु न जाणे ब्रह्मज्ञान । शिष्य विषयासक्त मन । गांठी पडे दोघांलागून । समाधान मग कैचें ? ॥९॥ अ ३६
उत्कृष्ट प्रतिभेचा नमुना म्हणून अ ४,५, व ६ याची मंगलाचरणें वाचावीत. अ ८ मधील गोरक्षांनीं केलेलें गुरुस्तवन, अ १० तील मानसपूजेचे आध्यात्मिक रुपकात्मक वर्णन, १५ व्या अध्यायांत ओव्या ४३ ते ४९ या ओव्यांत पडलेली हरदासी कीर्तनांतील कटावाची छाया, अ १६ मध्यें रामकृष्णादि अवतारांची मच्छिद्रनाथांच्या अवतारस्वरुपाशीं केलेली ओव्या ५९, ६०, ६१ मधील हृदयंगम तुलना, अ १८ यांत ओव्या १५ ते ३५ मध्यें आलेला नवविधा भक्तीचा व प्रत्येक भक्तांचा आलेला समर्पक उल्लेख तसेंच करूण व शृंगार या दोन रसांचा अनुक्रमें अ १४ (ओ १६ ते ४४) व अ २४ (ओ. ५९ ते ८०) झालेला समर्थ आविष्कार इत्यादि स्थळें वाचकांनीं अवश्य पाहावीतं. अध्याय ४० पर्यंत कवींचे रसिकत्व अनेक ठिकाणीं दिसतेच. त्यापैकीं कांही अध्याय ओव्यांचा येथें निर्देश झाला आहे. अ. १६ मध्यें मच्छेन्द्रनाथ महासमाधीस बसले त्यावेळचे ओव्या ८७ ते ११० यांतून आलेलें वर्णन वाचून नामदेवरायांनीं ज्ञानोबामाउलींच्या समाधिसोहळ्याचें जे वर्णन दिलें आहे - उदात्त आणि करुण या दोन रसांचा त्या अभंगांत जसा अपूर्व संगम झाला आहे - तसाच अनुभव ह्या ओव्या वाचतांना येतो. यानंतर एकच महत्त्वाचा पैलू नजरेस आणून हात आवरता घेतों. हा महत्त्वाचा पैलू म्हणजे सिद्धचरित्रांत, प्राजक्ताच्या फुलांच्या विपुलतेनें पखरण झालेलीं सुभाषितें व मननीय ओव्या - हा होय. `सिद्धचरित्रांतील सूक्ति रत्नावली' अशा नांवानें एक सुभाषित संग्रह छापावा अशी दुर्दम्य सदिच्छा होईल इतकीं सुभाषितें या पोथींत आढळतात. वैशिष्टय असें कीं अनेक ठिकाणीं ओवीच्या दोन चरणांतच सुभाषित व्यक्त होते. तसेंच तात्त्विक विचारांनीं भरलेल्या ओव्याही अनेक आढळतात. विवेचन न करतां पुढें फक्त कांहीं सुभाषितें (संपूर्ण ओव्या व अर्ध्या ओव्या) आणि कांहीं मननीय तात्त्विक स्वरुपाच्या ओव्या देत आहोंत.
`तूं निराकार । निर्गुण । भक्तालागी होसी सगुण । मियां वश केलें हा अभिमान - । होतांचि; जाण दुरावसी ॥
`स्त्रीपुरुषांचें भिन्न चित्त । जळो त्याचा प्रपंच व्यर्थ । तो गृहीं असताही अनर्थ । सुखस्वार्थ न पवेचि ॥
`क्षुधित शोधिती अन्नदाता । अन्नदाता पावे क्षुधार्ता । गांठी पडतां उभयतां । आनंद तत्त्वतां बहु होय ॥
`रोगी जाऊनि वैद्याकडे । चिकित्साशास्त्र बडबडे । तरी तयाचें साकडें । कोण वारी ? ॥
`मनुष्यजन्माची दुर्लभ प्राप्ति । यांतही विषयचि सेविती । तरी ते गेले अधोगतीं । देखतदेखती नागवले ॥
`त्याग असूनिया धन । प्रिय शब्दें जें ज्ञान । क्षमा असूनि शूरपण । लोकीं तीन दुर्मिळ ॥'
`आम्र वृक्षवसंतकाळीं । सांडोनि, सेवी जो बाभळी । तया नराच्या कपाळीं । ऊन तळीं; वरी कांटें ॥
`आपण पंचात्मक देहधारी । यालागीं काळाचे आहारीं । पडणें लागेल केधवां तरी । अचल अंतरीं स्मरे हे ॥
याप्रमाणें कांहीं सुभाषितांच्या संपूर्ण ओव्या वर लिहिल्या आहेत. आतां ओवीचे दोनच चरणांत सुंदर विचार जेथें आहे त्यांतील नमुना पहा :
निर्गुण जाणोनि सम्यक । सगुणीं प्रीति आत्यंतिक
गुप्त वस्तु; जन अंध । मग कैचा वस्त्बोध ।
परद्रव्यें जो का धर्म । तो होय केवळ अधर्म ।
ज्यासी सद्‍वासना होय । त्यासी श्रीहरि होतो सहाय ।
श्रीगुरु उपदेशाविण । ज्ञाना आन नाहीं साधन ।
नीच रायातें प्रीतिपात्र । त्यावरी धरिती सर्व छत्र ।
वंध्या नेणे प्रसूतिव्यथा । तेवींच नकळे हें अभक्ता । इ. इत्यादि.

कांही मननीय ओव्या देऊन हा भाग आटोपू.
`कनक कांतादि स्वकलेवर । असत्‍ क्लेशाचे भांडार ।
तेथें अहं ममतेचा विचार । सुज्ञ साचार स्वीकारीना ॥
`मुख्य पाहिजे विश्वास । आणि अभ्यासीं करावी कास ।
हेंचि पुरे सद्‍गुरुस । करी आस, तो गुरु नव्हे ॥
`देह तो असे प्रारब्धाधीन । सुख:दु:खें भोगी आन आन ।
त्याची वृथा चिंता वाहून । क्लेशाधीन कां व्हावे ? ॥
`अहो अज्ञानी भला भला । सत्वर पावे उध्दाराला ।
ज्ञानी अभिमानींच बुडाला । थित्या नागवला परमार्था ॥
`वेदशास्त्र पुराण सार । देहींच देव हा निर्धार ।
तैसा नसतां साक्षात्कार । कैसेनि स्थिर मन होय ? ॥
`पिता माता पुत्र पति । कोण कोणाचे निश्चितीं ।
अन्य जन्मींचे येथें न येती । सांगाती न होती अग्रजन्मीं ॥
श्रीसिद्धचरित्रांतील कवित्व व रसिकत्व येथें संक्षेपानें वर्णिले आहे. पुढील विभागांत `परतत्त्व स्पर्श' कसा जाणवतो तें पाहूं या.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP